गणेश नाईक यांचे खंदे समर्थक सुरेश कुलकर्णी यांचा शिवसेना प्रवेश निश्चित

नवी मुंबई : गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करण्यास टाळाटाळ करणारे तुर्भे स्टोअर येथील एक प्रबळ नगरसेवक आणि खंदे नाईक सर्मथक सुरेश शिवाजी कुलकर्णी त्याच विभागातील तीन नगरसेवकांना घेऊन पालिका निवडणुकी पूर्वी शिवसेनेते प्रवेश करणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. नाईक यांनी कुलकर्णी यांना तीनदी स्थायी समिती सभापती पदाचा मान दिलेला आहे. त्यामुळे कुलकर्णी यांचा तीन नगरसेवकांसह होणारा शिवसेना प्रवेश नाईक यांना मोठा धक्का मानला जात आहे. शुक्रवारी तुर्भे स्टोअर येथे दोन महिला मंडळांनी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशेजारी बसून कुलकर्णी यांनी शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले.

कुलकर्णी यांचे तुर्भे स्टोअर या झोपडपट्टी भागावर वर्चस्व आहे. गेली ३० वर्षे ते या भागातून नाईकांना मोठी ताकद देत आले आहेत. नाईकांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला या भागातून मताधिक्य देताना दोन ते तीन नगरसेवक निवडून आणण्याची कुवत कुलकर्णी यांच्या संघटनकौशल्यात आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी सोडलेली नाईकांची साथ त्यांना जिव्हारी लागणारी आहे. शुक्रवारी या भागात दोन महिला मंडळांनी आयोजित केलेले हळदी-कुंकू कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत कुलकर्णी यांचा औपचारिक प्रवेश झाल्यासारखे आहे.

पालिका निवडणुकीला अद्याप दोन महिन्याचा कालावधी आहे. प्रत्यक्ष निवडणुकीची तारीख जाहीर न झाल्याने आचारसंहिताही लागलेली नाही. याच काळात झटपट स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. यात अनेक नागरी प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना प्रवेशाने प्रभागाचे नुकसान होऊ नये, यासाठी कुलकर्णी यांनी तांत्रिकदृष्टय़ा जाहीर प्रवेश केलेला नाही. जाहीर प्रवेश करण्यासाठी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.  हा प्रवेश नगरसेवक अपात्र ठरण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.  याशिवाय महाविकास आघाडीत होणाऱ्या उमेदवारी वाटपात सोबत आलेल्या नगरसेवकांनाही उमेदवारी मिळण्याची हमी मिळाल्यानंतरच कुलकर्णी शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत.

शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेण्याआधी कुलकर्णी यांनी चार प्रभागांतील मतदारांचा कानोसा घेतल्याचे समजते. त्यावेळी भाजप सोडून दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करा असा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचे कळते. कुलकर्णी यांचा तुर्भे स्टोअर हा भाग भाजपसाठी अनुकुल नाही. या भागात मुस्लिम आणि दलित लोकवस्ती मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेना या जुन्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी भाजपचे जेष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांना स्पष्ट सांगितले आहे. कुलकर्णी नाईक यांना सोडून जात असल्याबद्दल शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक मतदारांचा भाजपला असलेला विरोध, नाईकांच्या दोन मुले आणि एक पुतण्या यांनी तयार केलेले प्रतिस्पर्धी, व्यवसायावर आणलेली गदा आणि स्थायी समिती सभापती पदाच्या काळात ‘कठपुतळी’ सारखी दिलेली वागणूक यामुळे कुलकर्णी यांनी नाईक कुटुंबियांची साथ सोडल्याची चर्चा आहे.

गळती रोखण्यासाठी प्रयत्न नाहीत

गेली चाळीस वर्षे नाईकांबरोबर सावली सारखे पाठिशी उभे राहणाऱ्या कुलकर्णी यांनी भाजपामध्ये जाण्यास नकार दिला होता पण किमान विधानसभा निवडणूकी पर्यंत साथ देण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. कुलकर्णी यांच्या पाठोपाठ आणखी सात आठ नगरसेवक भाजपा सोडणार आहेत. यात सीबीडीतील दोन, ऐरोलीतील दोन, कोपरखैरणे तील दोन आणि तुर्भे नोडमधील एक असे सात आठ नगरसेवक आहेत. नाईक यांनी पडत असलेले हे खिंडार बुजवण्याचा प्रयत्न केलेला नाही.

शिवसेनेतील निष्ठावंतांमध्ये असंतोष

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मविआचे सरकार आल्यामुळे नवी मुंबई भाजपाला खिंडार पडत असताना शिवसेनेत सर्वकाही आलबेल आहे असे चित्र नाही. शिवसेनेने यंदा सर्व जागा लढल्यास बहुमताचा पल्ला गाठता येत असताना काँग्रेस व राष्ट्रवादी या परांपरागत विरोधी पक्षांबरोबर आघाडी करुन त्यांना वाटेकरी करण्याची आवश्यकता काय, असा सवाल जुने जाणते शिवसैनिक करू लागले आहेत. निवडणूक पूर्वे आघाडी करण्यापेक्षा आवश्यकता भासल्यास निवडणुकीनंतर आघाडी करावा असा मत प्रवाह आहे. शिवसेनेचे सध्या ३८ नगरसेवक असून त्यात भाजपमधून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्वबळावर पालिका काबीज करण्यासारखे वातावरण असल्याचे ज्येष्ठ नगरसेवकांचे मत आहे. पालिकेत मविआ करण्याचा निर्णय झाला असून शिवसेनेच्या वाटय़ाला जास्त जागा देण्याची तयारी दोन्ही काँग्रेसनी दाखवली आहे. राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उ्द्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. अशावेळी पक्षाची ताकद वाढविण्याची हीच एक संधी असल्याचे जेष्ठ शिवसैनिकांचे मत आहे. पालिकेच्या १११ प्रभागात शिवसेनेने उमेदवार उभे केल्यास यावेळी शिवसेनेला ५० ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमुळे तीस ते चाळीस शिवसैनिकांची उमेदवारी कापली जाणार असून त्यांना दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांसाठी काम करावे लागणार आहे. याच ठिकाणी बंडखोरीची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. वाशीत झालेल्या महाविकास आघाडीच्या मनोमिलन मेळाव्यात उत्तर व दक्षिण नवी मुंबई शिवसेना प्रमुखांना एका कोपऱ्यात स्थान दिले गेले होते. त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. त्याऐवजी दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले. सेनेतील असंतोषाला यामुळे सुरुवात झाली आहे.

नाईक-चौगुले मनोमीलन

ऐरोली क्षेत्रात झोपडपट्टी भागावर प्रभुत्व असलेले नाईकांचे एकेकाळचे खंदे सर्मथक विजय चौगुले यांनी १५ वर्षांपूर्वी नाईक यांना रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी नाईक पुत्रांच्या विरोधात तीन निवडणुका लढविल्या मात्र नाईकांना त्यांना मात देता आली नाही. चौगुले विरुद्ध नाईक असा संघर्ष सुरू आहे.  तो विधानसभा निवडणूकीआधी कमी झाला आहे. सध्या या दोन कुटुंबांचे मनोमिलन झाले आहे. अशावेळी चौगुले यांच्याच समाजाचे असलेले दुसरे प्रभावी नेतृत्व कुलकर्णी नाईक यांच्यापासून दुरावत आहेत.