बुरा ना मानो होली है..

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीली प्रत्येक जागा महत्त्वाची असताना ठाणे लोकसभा मतदार संघात उभे राहण्याची पक्षश्रेष्ठींनी घातलेली गळ धुडकावल्याने माजी मंत्री गणेश नाईक व पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मध्ये एक दरी निर्माण झाली आहे. माजी खासदार आनंद परांजपे यांचे नाव पुढे करून लोकसभा निवडणुकीतून माघार घेणारे नाईक लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाईकांच्या शिवसेना प्रवेशाने जुन्या सैनिकांमध्ये चैतन्य आले असून दोन आमदारकी आणि पुढील वर्षी शिवसेनेचा भगवा पालिकेवरही फडकण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईच्या राजकीय सारीपाटावर येत्या काळात अनेक चाली होणार आहेत. त्यात नवी मुंबईचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या चालीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. खासदार राजन विचारे यांच्या सारख्या तगडय़ा उमेदवारापुढे नाईक यांना उभे करून तोंडघशी पाडण्याची राष्ट्रवादीतील काही नेत्यांची व्यहूरचना होती. त्यासाठी पक्षातील सर्व नेत्यांनी नाईक यांनाच उमेदवारी द्या! असा आग्रह धरला होता पण राष्ट्रवादीतील नेत्यांची चाल ओळखून नाईक यांनी उमेदवारी स्वीकारली नाही. त्यामुळे पक्षादेश न ऐकणारा नेता अशी एक प्रतिमा पक्षात तयार झाली आहे. परांजपे यांना निवडणून आणण्याची जबाबदारी नाईक कुटुंबीयाने घेतली असली तरी ती तडीस नेणे कठीण आहे अशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये ताणलेल्या संबंधात राहणे नाईक यांना आता जास्त काळ राहणे शक्य नसल्याने ते लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला रामराम ठोकून पुन्हा स्वगृही जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाईक यांचे शिवसेनेतील नेत्याबरोबर आजही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नाईक यांचे एकेकाळचे शिष्य आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर वाढलेले सौख्य अनेकांच्या भुवया उंचवणाऱ्या आहेत. त्यामुळे तेही लोकसभा भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत युती झाली नसती तर भाजपासाठी चौगुले यांनी याच काळात प्रवेश केला असता, पण आता भाजपचा ठाणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार नसल्याने हा प्रवेश लांबणीवर पडला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांना पुन्हा हरयाणा गाठावा लागणार असून निवडणुकीत नशीब आजमावे लागणार आहे.

शिवसेनेते जीव घुटमळत असल्याने नगरसेवक नामदेव भगत काँग्रेस मध्ये स्वगृही परतण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दोन्ही निवडणुकीत युती झाल्याने आमदारकीची गाजर खाणाऱ्या काही नगरसेवकांना पुन्हा एक वर्षांने नगरसेवकाची निवडणूक लढवावी लागणार आहे.

मंदा म्हात्रेंना डावलणार

नाईक यांच्या एका चालीवर अनेकांच्या चाली अवलंबून आहेत. नाईकांनी सेना प्रवेश केल्यास ते नवी मुंबईतील आमदारकीच्या दोन्ही जागांचा आग्रह धरणार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा युती धर्मात पत्ता कट होण्याची शक्यता आहे. हा पत्ता कट व्हावा यासाठी सेनेचे उपनेते विजय नाहटा आत्तापासून प्रयत्नशील आहेत. नवी मुंबईत एकही जागा मिळाली नाही तर नाहटा यांना विधान परिषदेवर पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत झालेली सेना-भाजप युती आगामी विधानसभा निवडणुकीसाठीदेखील कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.