माजी नगरसेविका दिव्या गायकवाड व त्यांच्या पतीचा पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

नवी मुंबई : तुर्भे, दिघा आणि आता वाशी या आमदार गणेश नाईक यांच्या नवी मुंबई नावाच्या अभेध किल्यातील बुरुज हळूहळू ढासळू लागले आहेत. वाशी येथील दोन माजी नगरसेवक दाम्पत्याने मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

माथाडी नेते व आमदार शशिकांत शिंदे यांची या प्रवेश प्रक्रियेत निर्णायक भूमिका ठरली असून तुर्भे येथील आणखी चार माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे घडय़ाळ हातावर बांधणार आहेत. मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या गायकवाड कुटुंबियांनी नाईक यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश करावा यासाठी चार वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले होते. त्याच गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याने आश्र्चय व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी तुर्भे येथील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी चार नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी सीबीडी येथील एका नगरसेवकानेही शिवसेनेला पसंती दिली होती. चार दिवसापूर्वी दिघा येथील माजी नगरसेवक नवीन गवते यांच्यासह तीन नगरसेवक शिवसेनेत गेले. त्यामुळे नाईक यांना सोडून जाणाऱ्या या निकटवर्तीय नगरसेवकांची संख्या आठ झाली आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतील ‘इनकमिंग’ला सुरुवात झाली असून वाशी सेक्टर चार या प्रभागाच्या माजी नगरसेविका दिव्या गायकवाड व त्यांचे पती वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. वैभव यापूर्वी प्रभाग क्रमांक ६४ चे नगरसेवक होते. २०१४ पासून होणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या बैठकीत नाईक यांनी भाजपाची कास धरावी असा आग्रह हे गायकवाड दाम्पत्य करीत होते. राष्ट्रवादीला आता भवितव्य नाही असे उद्गारही या दाम्पत्याने व्यक्त केलेले आहेत. नाईकांनी गेल्या वर्षी भाजपा प्रवेश केल्यानंतर सर्वाधिक खूश असलेल्या गायकवाड यांनी या पालिका निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला पसंती दिली आहे. गायकवाड यांच्यानंतर आणखी चार माजी नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार आहेत.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीत भाजपाचे अनेक नगरसेवक सोडचिठ्ठी देऊन प्रवेश करीत असताना काँग्रेसकडे मात्र कोणीही येत नसल्याने अस्वस्थता वाढली आहे.