आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात गमावलेले आपले अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे अथवा कल्याणमधून निवडणूक लढवावी यासाठी गळ घातली जात आहे, पण नाईक दिल्लीत जाण्यास नाखूश असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. यापूर्वीही दोन वेळा नाईक यांनी लोकसभा लढवावी असे प्रयत्न पक्षाकडून केले गेले होते, पण त्याला स्पष्ट नकार देत नाईक यांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांना पुढे केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या सर्व लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी भेटी देत आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील दोन जागांसाठी माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू आहे. शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश परांजपे यांच्या २००८ मध्ये झालेल्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी व २००९ मधील सार्वत्रिक निवडणुकीवेळीही  पवार यांनी नाईक यांना लोकसभेसाठी आग्रह केला होता, पण आपली ‘विधानसभा बरी’ सांगत नाईक यांनी ही संधी दुसऱ्यांदा नाकारली होती.

यंदाची लोकसभा निवडणूक ही यूपीएसाठी अटीतटीची आहे.  ठाणे जिल्ह्य़ात आगरी समाजाचे प्राबल्य जास्त आहे. त्याच बळावर राष्ट्रवादी नाईक यांच्यासारख्या सर्वपक्षीय ऋणानुबंध सांभाळणाऱ्या नेत्याला निवडणूक रिंगणात उतरविण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे, मात्र ही निवडणूक लढविण्यास नाईक आजही नाखूश असल्याचे समजते. त्यांचे चिरंजीव माजी खासदार संजीव नाईक यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याने गणेश नाईक यांचा पर्याय पक्षाने पुढे केला आहे.

रविवारी झालेल्या सायक्लोथॉन या सायकल स्पर्धेत ६९ वर्षीय नाईक यांनी भाग घेऊन आपण शारीरिकदृष्टय़ा आजही तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले. यावेळी आपण ठाण्यापर्यंत जाऊ असे सूचक विधान त्यांनी केले. त्याचा अर्थ ते ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचा काढला जात आहे, पण नाईक कोणत्याही परस्थितीत लोकसभा लढविणार नसल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि आमचे नेते माजी मंत्री गणेश नाईक हे दोघे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून पक्षाचा खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे. त्यात पिता-पुत्रापैकी कोणीही राहिले तरी आम्हाला सारखे आहेत.

-अनंत सुतार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नवी मुंबई