युवा मेळाव्यात नगरसेवकांना गणेश नाईक यांचा इशारा

पक्षाच्या शिस्तीचे पालन करायचे नसेल, संस्थानिकाप्रमाणे वागायचे असेल, तर सरळ बाहेरचा रस्ता धरा, असा इशारा माजी मंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा मेळाव्यात दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत स्वत:ला संस्थानिक मानून कारभार करणारे कोण नगरसेवक आहेत, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

विष्णुदास भावे नाटय़गृहात रविवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या युवा मेळाव्याला नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. इतरांवर चिखलफेक केल्याने आपण मोठे होतो, असे समजणाऱ्यांना देव सुबुद्धी देवो, असा टोला नाईक यांनी या वेळी लगावला. विषणुदास भावेचे सभागृह कमी पडत असल्याने राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सिडको प्रदर्शनी केंद्रात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जाती-पाती, पक्षाच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्यातून सर्वाना सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले. शारीरिक तंदुरुस्ती जपण्यासाठी, स्वत:साठी दोन तास वेळ काढा, सुसंगती असू द्या, असा सल्ला दिला.

स्वपक्षातील नगरसेवकांवर मात्र त्यांनी हल्लाबोल केला. महासभा, स्थायी समितीच्या आधी घेण्यात येणाऱ्या बैठकांना गैरहजर राहून सभेत स्वत:चे हित जपण्यासाठी पक्ष शिस्तीचे उल्लंघन करायचे असेल, तर सरळ बाहेरचा रस्ता धरावा, अशी तंबी नाईक यांनी दिली. स्वपक्षीयांना अडचणीत आणणे खपवून घेतले जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

‘मी राष्ट्रवादीतच

आपल्या पक्षबदलाबाबत माझ्यापेक्षा विरोधकांनाच जास्त उत्सुकता आहे. मी शरद पवार यांचे विचार मानणारा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रवादीतच आहे. मी कुठे जाणार हे माझ्यापेक्षा विरोधकांनाच जास्त माहीत असल्यामुळे त्यांनाच विचारा, असा टोला नाईक यांनी लगावला. देशात व राज्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

‘नाईक यांचे मानसिक संतुलन बिघडले’

मेळाव्याबाबत मंदा म्हात्रे यांच्याकडे विचारणा केली असता आरोप करणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आपण मंत्री असताना कधी राज्याबाहेर गेलात का, असा सवाल म्हात्रे यांनी केला. भाजप सरकारबाबत बोलताना जपून बोलण्याचा इशाराही त्यांनी दिला.