07 August 2020

News Flash

नवी मुंबईत गणेश नाईक यांची कसोटी

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे कडवे आव्हान

गणेश नाईक (संग्रहित छायाचित्र)

विकास महाडिक

गेली २५ वर्षे नवी मुंबई पालिकेची दोन पक्षांच्या माध्यमातून निर्विवाद सत्ता ताब्यात ठेवणारे भाजपचे आमदार गणेश नाईक यांची यंदा एप्रिलमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने पुढील आठवडय़ात राज्यस्तरीय अधिवेशन, तर महाविकास आघाडीने अलीकडेच मेळावा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

नवी मुंबई आणि गणेश नाईक हे समीकरणच तयार झाले. पण या समीकरणाला छेद देण्याकरिता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे नाईकांचे जुने दोन पक्ष एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, तसे संकेतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेश नाईक यांच्यासारखा मोहरा गळाला लागल्याने नवी मुंबईत मुसंडी मारण्याकरिता भाजपला आयतीच संधी मिळाली. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचा भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी पराभव केला, पण महापालिका निवडणुकीत भाजपची डाळ शिजू शकली नाही. पक्ष संघटनही वाढले नाही. या पाश्र्वभूमीवर गणेश नाईक आणि त्यांच्या दोन पुत्रांनी भाजप प्रवेश केल्याने भाजपचा आशा पल्लवित झाल्या. विधानसभा निवडणुकीत बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे तर ऐरोलीतून गणेश नाईक या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या होत्या. यामुळेच महापालिकेवर भाजपचे कमळ फुलेल, अशी भाजप नेत्यांना अपेक्षा आहे. पालिकेची निवडणूक लक्षात घेता, वातावरणनिर्मितीकरिता भाजपने राज्यस्तरीय अधिवेशनासाठी मुद्दामच नवी मुंबईची निवड केली आहे.

नवी मुंबई आपल्याच ताब्यात राहणार असा दावा गणेश नाईक करीत असले तरी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने एकत्र येऊन नाईकांना धक्का देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नवी मुंबईत भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळे भाजपामधील नाराज गटही नाईकांच्या विरोधात काम करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पक्षीय बलाबल : पालिकेत सध्या भाजपाचे ६०, शिवसेना ३८, काँॅग्रेस १० आणि राष्ट्रवादी ३ असे संख्याबळ आहे. तांत्रिकदृष्टय़ा महापौर जयवंत सुतार हे नाईक समर्थक असूनही भाजपात गेलेले नाहीत. नाईकांनी भाजपा प्रवेश करताना राष्ट्रवादीचा सुपडा साफ केला असला, तरी या पालिका निवडणुकीत डझनभर भाजपा नगरसेवक हे शिवसेनेत किंवा राष्ट्रवादीत स्वगृही परतण्याची शक्यता वर्तविली जाते. असे झाल्यास नाईकांसाठी हा मोठा धक्का असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 12:57 am

Web Title: ganesh naiks test in navi mumbai municipal elections abn 97
Next Stories
1 नाईक गडाचा पहिला बुरुज ढासळला
2 पनवेल खूनप्रकरणी चौघांना अटक
3 यंदा हापूसची गोडी महाग
Just Now!
X