08 March 2021

News Flash

निरोपासाठी चोख व्यवस्था

भव्य मूर्तीसह निघणाऱ्या तेवढय़ाच भव्य मिरवणुकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

नवी मुंबईत ३२५ , पनवेलमध्ये १७० सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे आज विसर्जन

गेले १२ दिवस मनोभावे पूजन केलेल्या गणरायांना निरोप देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाविकांची गैरसोय होऊ नये, वाहतुकीत अडथळे येऊ नयेत म्हणून नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. भव्य मूर्तीसह निघणाऱ्या तेवढय़ाच भव्य मिरवणुकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेने विसर्जन व्यवस्थेसाठ तब्बल ८५ लाख रुपये खर्च केले आहेत.

डॉल्बीवर बंदी घालण्यात आल्यामुळे यंदा सर्वच मंडळांना ढोल-ताशे, लेझिम पथके यांच्या तालावर मिरवणुका काढाव्या लागणार आहेत. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तशा नोटिसा नवी मुंबईतील पोलिसांनी सर्व मंडळांना पाठवल्या आहेत. नवी मुंबईत ३२५ तर पनवेल विभागात १७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे विसर्जन करण्यात येणार आहे. शिवाय हजारो घरगुती गणपतींचेही विसर्जन करण्यात येणार आहे.

पालिकेने गणेशोत्सवासाठी २० कलमी नियमावलीच सादर केली होती. त्यामुळे मंडळांनी उत्सवकाळात बऱ्याच नियमांचे पालन केले. परिमंडळ एक व दोनमधील पोलीस उपायुक्तांनी सार्वजनिक मंडळांच्या बैठका घेऊन उत्सवाबाबत व विसर्जनाबाबत नियमावलीची माहिती दिली होती. तरीही ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर पोलीसांनी  गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या १० मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नेरुळ येथील ४, कोपरखैरणेतील २, एपीएमसीत १, बेलापूरमध्ये १, रबाळेत १, रबाळे एमआयडीसीत १ आणि वाशीतील ९ मंडळांचा त्यात समावेश आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रत्येक तलावाच्या काठावर महापालिकेने मंडप उभारून ध्वनिक्षेपकाची सोय केली आहे. विसर्जनासाठी छोटे तराफे आहेत. मोठय़ा मूर्तीसाठी यांत्रिक तराफे ठेवण्यात आले आहेत, तसेच या मूर्ती मोठय़ा वाहनांतून उतरवण्यासाठी फोरक्लिपची व्यवस्था आहे. विसर्जनस्थळांवर जनित्रांची व्यवस्था केली आहे. विभाग अधिकाऱ्यांमार्फत स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक विसर्जनस्थळी कमीत कमी १५ पोहणारे स्वयंसेवक नेमले आहेत. स्वयंसेवकांना टी शर्ट, बम्र्युडा, चहा-नाश्ता तसेच जेवण व अंगाला लावण्यासाठी तेल दिले आहे. विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवकही विसर्जनस्थळी मदतीला असणार आहेत. वाशीमध्ये स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. तर वाशी शिवाजी चौकात गणेशमूर्तीवर महापौर, आयुक्त व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

विसर्जन घाटावर आरती करताना मूर्ती ठेवण्यासाठी  यंदा सेतू अ‍ॅडव्हर्टायझिंगने शिरवणे व वाशी येथील तलावांवर आकर्षक किऑक्स ठेवले आहेत.

ठाण्यातील वाहतूक बदलाचा नवी मुंबईवरही परिणाम

 • नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहने. टीएमटी, एनएनएमटी तसेच खासगी बसगाडय़ांना विटावा येथे प्रवेश बंद करण्यात आली आहे. ही वाहने ऐरोली, मुलुंड, आनंदनगर चेकनाका मार्गे ठाण्यात वळविण्यात येणार आहेत. तर टीएमटी, एनएनएमटी तसेच खासगी बसगाडय़ा विटावा येथूनच प्रवाशांची वाहतूक करणार आहेत.
 • कळवा खाडी पूलमार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना शहरातील गोल्डन डाइज नाका आणि बाळकुम नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला असून या वाहनांना पूर्व द्रुतगती महामार्गावरून नवी मुंबईमध्ये सोडण्यात येणार आहे.
 • खारेगाव टोल नाकामार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोल नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहनेही पूर्व द्रुतगतीमार्गे नवी मुंबई शहरात सोडली जाणार आहेत.
 • पनवेल तसेच कल्याण येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना शीळफाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
 • ठाण्यातील घोडबंदर येथील गायमुख येथील जकात नाका भागात ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने चिंचोटी नाका-भिवंडी अंजूरफाटा- अंजूर चौक-मानकोलीमार्गे ठाण्यात सोडण्यात येतील.

८५ लाखांचा खर्च

 • तराफे १८ लाख रुपये
 • विद्युत व्यवस्था २७ लाख रुपये
 • स्वयंसेवक ४० लाख रुपये
 • स्वागत कमानी, पुष्पवृष्टी १ लाख रुपये

पोलीस बंदोबस्त

परिमंडळ १

 • पोलीस अधिकारी-१५०
 • पोलीस कर्मचारी-१०००
 • दंगा काबू पथके-४
 • एसआरपी तुकडी-१

परिमंडळ २

 • पोलीस अधिकारी-८८
 • पोलीस कर्मचारी-७५०
 • दंगा काबू पथके-१
 • एस आरपी-१

शहरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बैठक घेऊन विसर्जन मिरवणुकीबाबतही सूचना दिल्या आहेत. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळावर कारवाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे किंवा पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांपर्यंत शिक्षा तसेच एक लाखापर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

शहरात डॉल्बीवर बंदी घालण्यात आली आहे. गणेशभक्तांनी आतापर्यंत शिस्तीचे पालन केले आहे. परिमंडळ दोनमध्ये विसर्जनादरम्यान एकही गुन्हा दाखल झालेला नाही. अशाचे प्रकारे मंडळांनी व गणेशभक्तांनी शांततेत विसर्जन करावे.

–  राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २

विसर्जनासाठी वाहतूक विभागाने योग्य व्यवस्था केली आहे. वाहतूक पोलीस तैनात असणार आहेत. गणेशभक्तांनीही वाहतूक विभागाला योग्य सहकार्य करावे.

नितीन पवार, उपायुक्त वाहतूक विभाग

विसर्जनासाठी पालिकेने जय्यत तयारी केली आहे. नागरिकांनी चांगली फळे निर्माल्यात टाकू नयेत. विसर्जनस्थळांवर वेगळे क्रेट ठेवले आहेत, त्यात फळे ठेवावीत. ही फळे नेरुळ येथील विश्व बालक केंद्र तसेच सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्टला देण्यात येणार आहेत.

दादासाहेब चाबुकस्वार, नवी मुंबई महापालिका, उपायुक्त परिमंडळ एक

ध्वनिप्रदुषणाबाबतच्या कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईच्या नोटीसा पोलिसांनी विसर्जनापूर्वी सर्वच गणेशोत्सव मंडळांना पाठवल्या आहेत. आमचे मंडळ कोणत्याही नियमाचा भंग न करता विसर्जन करणार आहे.

भरत नखाते, अध्यक्ष, व्यापारी संघ गणेशोत्सव मंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 1:26 am

Web Title: ganesh visarjan 2017 ganesh visarjan in navi mumbai nmmc
Next Stories
1 नेरुळच्या वाचनालयात श्वानांचे बस्तान
2 शहरबात- उरण : नियोजनटंचाईच्या झळा
3 कुटुंबसंकुल : नव्या-जुन्याची सांगड
Just Now!
X