पूनम धनावडे, नवी मुंबई

थर्माकोलच्या मखराला लाकूड, कापड, पुठ्ठय़ाचा पर्याय

गणेशोत्सव जवळ आला असताना आणि यंदा थर्माकोलवर बंदी असताना भक्तांना चिंता आहे ती सजावटीची; मात्र थर्माकोलची उणीव अजिबात भासू नये म्हणून ठिकठिकाणचे कलाकार सरसावले आहेत. लाकूड, कागद आणि कापडापासून तयार केलेली वैविध्यपूर्ण मखरे त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत.

वाशीतील घाऊक बाजारात मोठय़ा प्रमाणात गणेशोत्सव सजावट साहित्य आणि विविध प्रकारची मखरे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदा लाकडावर कोरीव काम करून पॉलीश केलेली मखरे खास आकर्षण ठरली आहेत. ही मखरे केवळ दोन आकारांत उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती ३ हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत आहेत.

‘लाकडी मखरला अधिक पसंती मिळत आहे. आत्तापर्यंत १५० हून अधिक मखरे विकली गेली आहेत. आणखी १५० मखरे मागणीनुसार तयार करून ठेवली आहेत,’ अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. आतून पुठ्ठा आणि सजावटीकरिता वेगवेगळ्या रंगांचे कार्डबोर्ड, कार्डपेपर वापरूनही मखरे तयार करण्यात आली आहेत. त्यावर विविध प्रकारच्या लेस, मणी लावून सजावट करण्यात आली आहे. ही मखरे दोन ते आठ हजार रुपयांना विकली जात आहेत.

कापडी सजावट करून तयार केलेले मखर हे दोन्ही पर्यायांपेक्षा महाग आहे. ही मखरे किमान पाच हजार ते जास्तीत जास्त १५ हजार रुपयांना उपलब्ध आहेत. बंदी लागू होण्यापूर्वीच तयार केलेल्या थर्माकोलच्या मखरांचे काय करायचे, असा प्रश्न मखर विक्रेत्यांना पडला आहे. आमच्या शिल्लक साहित्याची भरपाई मिळणार नाही. त्यामुळे नाइलाजास्तव आम्हाला ही मखरे विकावी लागतील, अशी प्रतिक्रिया काही विक्रेत्यांनी दिली.

उरणमध्ये प्रदर्शन

उरणमधील काही तरुणांनी इको फ्रेण्डली संस्था स्थापन केली आहे. त्यांनी विविध आकारांतील पर्यावरणस्नेही मखरे तयार केली असून त्यांच्या किमती तीन ते सहा हजार रुपयांदरम्यान आहेत. उरणच्या गणपती चौकात २२ व २३ ऑगस्टला त्यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

यंदा थर्माकोलला इतर पर्याय उपलब्ध आहेत. कापडी बनावटीचे मखर जास्त महाग असल्याने त्याला कमी मागणी आहे. पुठ्ठा आणि कार्डपेपरची मखरे कमी दरात उपलब्ध आहेत, त्यांना मोठी मागणी आहे.

– शहाजी पाटील, विक्रेते, वाशी