व्याजाचे आमिष दाखवून हजारो लोकांची कोटय़वधींची फसवणूक करणाऱ्या टोळीला आर्थिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आतापर्यंतच्या तपासात ५ हजार १७० गुंतवणूकदारांचे १८ कोटी २९ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांच्या व्यवहारातून हे आकडे समोर आले आहेत.

संचालक गणेश भवनम, प्रवर्तक लोणाचंद कुरी अकोसे, किशोर रोकडे, अंकुश अहेर, रोखपाल एस. एस. रमेश, उपदेशक (ग्राहकांना योजना पटवून देणारे) रमेश माने यांना अटक केली आहे. या सर्वानी मिळून तुर्भे एमआयडीसी येथे ए. एस. पिश्चर्स नावाने कार्यालय थाटले होते. ४०० दिवसांत ४ पट परतावा अशी जाहिरात करीत करण्यात आली होती. नालासोपारा येथील राजेश गुर्गे यांच्याकडून http://www.cliked.com  संकेतस्थळ तयार करून घेतले होते. गुंतवणुकीसाठी ३ हजार, ५ हजार, १० हजार, ३० हजार, ५० हजार, १ लाख, ३ लाख, ५ लाख आणि १० लाख असे टप्पे ठेवले होते. या शिवाय ३ हजार ते १ लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना पावती दिली जात नव्हती.

जीएसटीसह पैसे गुंतवायचे आणि जीएसटीशिवाय गुंतवण्यासाठी वेगवेगळे खाते क्रमांक देण्यात आले होते. अन्य गुंतवणूकदार आणल्यास त्यातही कमिशन दिले जात होते.

४०० दिवसांत ४ पट

या फसवणुकीची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून त्यांच्या कार्यशाळेत पाठविले. त्या वेळी कंपनीने गुंतवणूकदारांना दिलेली आमिषे ऐकून पोलीसही चक्रावले होते. ४०० दिवसांत ४ पट परतावा तर मोठी गुंतवणूक केल्यास कार भेट देणार अशी आमिषे दाखवली जात असल्याचे पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले.