10 July 2020

News Flash

महिलेवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अटकेत

नातेवाईकांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार नोंदवली होती.

(संग्रहित छायाचित्र)

 

नवी मुंबई : मदत मागण्यासाठी आलेल्या एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या तिघांना रबाळे पोलिसांनी अटक केली. यातील एका आरोपीने लैंगिक शोषण करून तिच्याकडील दागिने हिसकावून घेतले होते. अटकेतील तीनही आरोपी हे विशीतील आहेत.

मूळची नाशिकची पण मुंब्रा येथे राहण्यास आलेली १९ वर्षीय विवाहिता तिच्या नातेवाईकांसोबत घरोघरी जाऊन तूप विक्रीचा व्यवसाय करीत होती. १८ फेब्रुवारी २०२० रोजी ती घाटकोपर येथे गेली होती. तेथे ग्राहकांना तूप विकून घरी परतत असताना तिची आणि नातेवाईकांची घाटकोपर स्थानकात ताटातूट झाली. याबाबत तिच्या नातेवाईकांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार नोंदवली होती.

दरम्यान पीडित महिला उपनगरी गाडीने दिवा रेल्वे स्थानकात पोहोचली, मात्र शहराची माहिती नसल्याने तिने नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिने रात्र दिवा स्थानकात काढली. स्वत:कडील पैसे संपल्याने तिने सोन्याचा दागिना विकण्यासाठी  मुंब्रा रेल्वे स्थानकात भीक मागणाऱ्या एका महिलेला गळ घातली, मात्र तिच्याकडेही एवढे पैसे नसल्याने तिने महापे येथे स्वत:च्या झोपडीत तिला नेले. दागिना विकण्याचा प्रयत्न करूनही त्यात यश न आल्याने भीक मागणाऱ्या महिलेने पीडितेला रात्री आठच्या सुमारास रबाळे साई सागर चौकात एक रिक्षा गाठून त्यात बसवले आणि रिक्षाचालकास एखाद्या स्थानकावर सोडण्याची सूचना केली, मात्र रिक्षात बसलेली महिला या परिसरात नवखी असल्याचे लक्षात आल्यावर रिक्षाचालकाने महापे परिसरातील एका पडीक इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. शिवाय तिच्याकडील दागिने हिसकावले. त्यानंतर तिला राम मंदिर परिसरात सोडून तेथून पळ काढला. त्यानंतर दुचाकीवरील दोन तरुणांनी रात्री दहाच्या सुमारास तिला स्थानकात सोडण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवले आणि घणसोली स्थानकाजवळ निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या साऱ्या प्रसंगांनंतर तिने घणसोली स्थानकातून गाडी पकडली आणि ठाणे गाठले. ठाणे स्थानकात उतरल्यावर तिने नाशिकला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडीची चौकशी केली. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता नाशिकसाठी गाडी असल्याचे सांगण्यात आले. ठाणे स्थानकात रात्र काढल्यानंतर तिने दुपारी नाशिककडे जाणारी गाडी पकडली. तिची अवस्था पाहून नाशिकमधील एका पोलिसाने तिची चौकशी केली. त्यानंतर सारा प्रकार उघड झाला. त्यानंतर तिने तिच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात आणले.

नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर कार्यवाही

नाशिक पोलिसांनी याबाबत संपर्क साधून कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची सूचना केली. त्यानंतर हे प्रकरण रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास करताना पीडित महिलेने वर्णन केल्याप्रमाणे गाडी आरोपी यांचा शोध सुरू करण्यात आला. याशिवाय सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी सुरू करण्यात आली. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे २३ फेब्रुवारी रोजी रात्री आरोपींना अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:06 am

Web Title: gang rape women three arrest akp 94
Next Stories
1 सकाळी वर्दळ, दुपारी शुकशुकाट
2 फेरीवाल्यांच्या त्रासातून मुक्त करा!
3 पालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी २३ मार्चला
Just Now!
X