नवी मुंबई : करोना संसर्गापासून बचावासाठी वापरण्यात येणाऱ्या निळ्या रंगाच्या रबरी हातमोज्यांच्या फेरवापरास परवानगी नसताना ते धुऊन पुन्हा बाजारात विकणाऱ्या टोळीचे धागेदोरे बंगळूरु, हरियाणापर्यंत गेले आहेत. या प्रकरणाचे पितळ उघडे पडल्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेने भिवंडी आणि औरंगाबाद येथेही छापा टाकून मोठय़ा प्रमाणावर माल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून अटकेतील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

पावणे औद्योगिक क्षेत्रातील गामी इंडस्ट्रियल पार्कमधील गाळा क्रमांक २९ आणि ३२ येथे डॉक्टरांनी वापरलेले निळे रबरी हातमोजे धुऊन ते नव्याने बंदिस्त करून विकण्यासाठी तयार केले जात होते.

या प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर भिवंडी आणि औरंगाबाद येथे छापा टाकण्यात आला. शुक्रवारी रात्री भिवंडी येथील गोदामात टाकलेल्या छाप्यात अफरोज शेख  याला अटक करण्यात आली. भिवंडी येथेही नवी मुंबईप्रमाणेच एकदाच वापर करण्यायोग्य असलेले रबरी निळे हातमोजे धुऊन नव्याने वापरासाठी बंदिस्त केले जात होते. भिवंडीत टाकलेल्या छाप्यात १२ टनांच्या आसपास माल जप्त करण्यात आला.   भिवंडी व नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी अटक आरोपींनी औरंगाबाद येथील वाळुंज येथे छापा टाकून विपुल शहा व नदीम खान यांना अटक केली.