नवी मुंबई : कोरोना प्रादुर्भाव कमी होत नसल्याने अनेक गणेश मंडळांनी दीड ते पाच दिवसांचा व लहान गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून यात अजून अनेक गणेश मंडळांची भर पडू शकते याचा सर्वाधिक आर्थिक फटका गणेश मूर्तिकारांना बसणार आहे.

गणेश मूर्त्यांची उंची हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जेवढी मूर्ती मोठी तेवढी जास्त प्रसिद्धी आणि तेवढी जास्त गर्दी हे गणित अनेक दिवसापासून सुरू आहे. त्याच विविध आकाराच्या गणेश मूर्तीचे आकर्षणसुद्धा मोठय़ा प्रमाणावर असते ही आवड ओळखून गणेश मूर्तिकार मूर्ती बनवतो. जेव्हा शक्तिमान मालिका प्रसिद्ध होती तेव्हा शक्तिमानच्या पोजमध्ये गणेश मूर्ती विकल्या जात होत्या. तोच ट्रेंड आजही कायम असून सुप्रसिद्ध मालिका वा चित्रपटाची व्यक्तिरेखाप्रमाणे गणेश मूर्तीना मागणी असते.  या शिवाय सुप्रसिद्ध गणपतींची प्रतिकृतीसुद्धा मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र सध्या करोनाच्या काळात सार्वजनिक गणेश उत्सव साजरे करण्यावर गृह मंत्रालयाने लावलेले र्निबध आणि करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांनी ११ दिवसांच्याऐवजी दीड ते पाच दिवसांचा गणेश उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. तसेच मिरवणुकीवरच प्रतिबंध असल्याने कमी उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचेही अनेकांनी जाहीर केल्याने गणपती कारखानदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

आतापयर्ंत घेतलेल्या ऑर्डर रद्द झाल्या असून मिळू शकणाऱ्या ऑर्डरची शाश्वती नाही. त्यामुळे यंदा मोठय़ा गणपती मूर्तीचे करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पुढल्या वर्षीपर्यंत जर जपून ठेवायच्या म्हटले तरी तात्पुरती घेण्यात आलेली कारखान्याच्या जागेचे भाडे वर्षभर भरणे कुठल्याही परिस्थिती शक्य नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका प्रत्येक मूर्तिकारांना बसला आहे अशी माहिती वैभव म्हात्रे या मूर्तिकाराने दिली.