तळोजात शेतकऱ्यांचा, नवी मुंबईत नगरसेवकांचा कचरा टाकण्यास विरोध

कचरा समस्येवरून सिडको प्रशासन ‘आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना, अशा कचाटय़ात सध्या सापडले आहे. सिडकोच्या वसाहतींमधील बेसुमार कचरा रस्तोरस्ती भरून वाहू लागला आहे.

कचराभूमीची मर्यादा संपत आल्याने मध्यंतरी सिडकोने हा कचरा नवी मुंबई पालिकेच्या तुर्भे येथील कचराभूमीत टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्याला पालिकेने मान्यताही दिली; परंतु तुमची समस्या तुम्हीच निस्तरा, असा पवित्रा घेत नवी मुंबईतील नगरसेवकांनी हा कचरा तुर्भेत टाकण्यात विरोध दर्शवला आहे. काही दिवसांपासून हा कचरा वसाहतींच्या बाहेरच टाकण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही काळाने प्रत्येक सिडको वसाहतीची कचराभूमीची निर्मिती होण्यास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

नवी मुंबई महापालिकेने तुर्भे येथील नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पामध्ये हा कचरा टाकण्याची मुभा दिली होती. मात्र तेथील लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे सिडकोचे तेथेही नियोजन फिस्कटले आहे. यामुळे वसाहतीच्या प्रत्येक चौकात कचऱ्याचे साम्राज्य असल्याने शहरांच्या नियोजनाचा टेंभा मिरवणाऱ्या सिडको प्रशासनासमोर कचऱ्याचे विघटन करावे कुठे हा प्रश्न पडला आहे.

नवी मुंबई महापालिकेने तूर्भे येथील नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पामध्ये सिडको वसाहतींमधील कचरा टाकण्याची मुभा दिली होती. मात्र तेथील लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे सिडकोचे तेथेही नियोजन फिसकटले आहे.

सिडकोचे मुख्य अभियंता के. वरखेडकर आणि नवी मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठका सूरु आहेत. त्यातून हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा सिडकोने व्यक्त केली असलीतरीही तळोजातील ग्रामस्थांप्रमाणे नवी मुंबईतील काही नगरसेवकांनी याला कडाडून विरोध केल्यामुळे हा प्रश्न सध्या न सुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सिडकोच्या प्रत्येक वसाहतीमध्ये एक कचरा क्षेपणभूमी उभी राहणार आहे.

सध्या खांदेश्वर, खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, नावडे, तळोजा या वसाहतींमधील प्रत्येक इमारतीच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत.

सिडको प्रशासनाने सध्या प्रत्येक वसाहतीमधील मोकळ्या भूखंडावर कचरा जमा करून तात्पुरता इलाज शोधला आहे. याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास कचऱ्यामुळे वसाहतींमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी भीती वैद्यकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत.

  • सिडको प्रशासनाने तळोजा येथे उभ्या केलेल्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे स्थानिकांची भातशेती धोक्यात
  • दरुगधीमुळे कुटुंबीयांना त्रास
  • कचराभूमीतील दरुगधीयुक्त पाणी भातशेतीत शिरल्याने पिकाचे नुकसान
  • कचरा टाकण्यास ग्रामस्थांचा विरोध केल्याने सिडकोने वसविलेल्या प्रत्येक वसाहतीत कचऱ्याचे मोठे ढीग

तळोजा येथील नागरी घनकचरा व्यवस्थापनामध्ये कचरा टाकण्याचे बंद केल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालिकेने तुर्भे येथील घनकचरा प्रकल्पात सिडको वसाहतींचा कचरा टाकण्याची परवानगी दिली आहे. तेथेही काही जणांनी विरोध केल्यामुळे तेथेच कचरा टाकता यावा यासाठी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये बैठका सुरू असून लवकरच हा प्रश्न सुटेल.

– मोहन निनावे, सिडको जनसंपर्क विभाग अधिकारी