सिडकोच्या घंटागाडीची तीन दिवसांतून एकच फेरी

एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत असताना खारघरमध्ये मात्र ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सिडको स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे. २ ते ३ दिवसांनी घंटागाडी येते. तिची वेळही निश्चित नसते.

सेक्टर १२ मधील रहिवाशांना कचरा टाकण्यासाठी पायपीट करत कचराकुंडी गाठावी लागते. सेक्टर ४ येथील सिडकोच्या नोडल कार्यालयाच्या बाजूला स्वच्छ नवी मुंबई अभियानाचा फलक लावण्यात आला आहे, मात्र त्या फलकाच्या बाजूलाच गवत वाढले आहे. त्यावर प्लास्टिक पिशव्यांचा ढीग साचला आहे. दुसऱ्या बाजूला झाडांच्या पालापाचोळ्याचा खच पडला आहे. पावसाळ्यानंतर येथील गवत काढण्यात आलेले नाही. ते आता सुकले आहे. त्यामुळे आग लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

१ ऑक्टोबरला पनवेल महानगरपालिका स्थापन झाली. त्यामुळे आता नागरी सुविधा सिडकोला महापालिकडे सुपूर्द कराव्या लागणार आहेत, मात्र सध्या निवडणुकीचा कालावधी असल्याने आणि पनवेल महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने या नागरी, आरोग्य सुविधांची जबाबदारी सिडकोच्या खांद्यावरच आहे. निदान अजून ६ महिने ही जबाबदारी सिडकोकडे राहणार असल्याचे आरोग्य अधिकारी बी. एस. बावस्कर यांनी सांगितले. त्याचबरोबर नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कचरा वेळेवर उचलला जात असल्याचा दावा

सिडकोचे आरोग्य अधिकारी  बी. एस. बावस्कर यांनी सांगितले की, खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, पनवेल येथील वसाहतींमधील कचरा वेळेवर उचला जातो. दररोज एकूण ३२५ टन कचरा वाहून नेला जातो. यासाठी ठेकादर नेमून त्यांच्या माध्यमातून स्वच्छता केली जाते. एकूण ७०० सफाई कर्मचारी, २० आरसी कॉम्पॅक्टर कचरा गाडी, खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, पनवेल या विभागांसाठी ४ घंटा गाडी अशी व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र आधीच्या ठेकेदारांचा ठेका हा एप्रिलमध्ये संपणार होता. मात्र तो आधीच बंद करण्यात आला. पनवेल पालिका निवडणुकीनंतर या सर्व सुविधा ताब्यात घेणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेसाठी आम्ही नवीन ठेकेदार नेमला असून त्याला ६ महिन्यांची सफाईची जबाबदारी देण्यात आली आहे.

बस थांबाही कचऱ्यात 

बेलपाडा गावाच्या रस्त्यावरील एका बाजूच्या पदपथाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यावर गवत उगवलेले आहे. बेलपाडा बस थांबा हा पूर्णत: कचऱ्याच्या साम्राज्यात अडकलेला आहे. तसेच बस थांब्याच्या मागे प्रचंड वाढलेली झुडपे असून त्यात कचरा आणि डेब्रिजची भर पडली आहे. बस थांब्यांवर प्रवाशांना नाक मुरडून उभे राहवे लागत आहे.