15 December 2017

News Flash

कचऱ्याच्या दरुगधीमुळे खारघरवासी हैराण

खारघर शहरातील अनेक भूखंडांवर सध्या अशीच परिस्थिती आहे.

वार्ताहर, नवी मुंबई | Updated: August 5, 2017 1:18 AM

पनवेल पालिका आणि सिडकोतील असमन्वयाचा फटका

स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास आलेल्या खारघर शहरातील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून त्याच्या दरुगधीने आजूबाजूचे नागरिक त्रस्त झाले आहेत.

पनवेल महापालिकेच्या निर्मितीनंतर सिडको आणि पालिका असमन्वयामुळे पायाभूत सुविधांवर परिणाम होत असल्याचे प्रकर्षांने दिसत आहे. त्यामुळेच पावसाळ्याच्या दिवसांत खारघरमधील अनेक मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचरा आणि त्यामुळे परिसरात पसरणाऱ्या दरुगधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. खारघरमधील से. १९ येथील भूखंड क्रमांक १४, बेलपाडा गाव आणि से. १२ येथील सिडकोच्या भूखंडावर अशाच प्रकारे कचऱ्याचे ढीग साचले असून त्याच्या दरुगधीमुळे परिसरातील नागरिकांचे जगणे असह्य़ झाले आहे. शिवाय पावसाळा असल्याने या कचऱ्यामुळे मोठय़ा प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून त्यामुळे साथीचे आजारदेखील पसरण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे हा साचलेला कचरा उचलण्याचे उत्तरदायित्व कोणाचे, हा प्रश्न सोडविण्यापेक्षा सिडको किंवा पनवेल महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी नागरिकांची आहे.

खारघर शहरातील अनेक भूखंडांवर सध्या अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना दरुगधीसोबतच साथीच्या आजारांचादेखील सामना करावा लागत आहे. सेक्टर १९ येथील भूखंडाचीदेखील अशीच परिस्थिती आहे. शिवाय या भूखंडाशेजारीच बस थांबा असल्याने बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना दरुगधीतच उभे राहावे लागत आहे. तर या कचऱ्यामध्ये सापदेखील असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा साचलेला कचरा तात्काळ उचलण्यात यावा, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.

भूखंड क्रमांक १४ वरील कचरा दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत सिडकोकडे अनेकदा तक्रारीदेखील करण्यात आल्या आहेत; पण अद्याप त्याची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि या दरुगधीतून रहिवाशांना सोडवावे, अशी विनंती आहे.

एस.जे. डिसूझा, रहिवासी, खारघर

सिडकोच्या भूखंडावरील साचलेला कचरा स्वच्छ करण्यात येईल; पण नागरिकांनीदेखील हा कचरा कुठे टाकला पाहिजे, याचे भान बाळगण्याची गरज आहे. अशा नागरिकांवर कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे नसल्याने पनवेल पालिकेकडे हे भूखंड हस्तांतर झाल्यानंतर पालिका दंडात्मक कारवाई करू शकेल.

बी.एस. बावसकर, आरोग्य अधिकारी, सिडको

First Published on August 5, 2017 1:18 am

Web Title: garbage issue in kharghar 2