X

तेलतवंगाने किनारे काळवंडले

अरबी समुद्रातून सध्या मोठय़ा प्रमाणात महाकाय जहाजांची वर्दळ सुरू आहे.

उरणमधील पिरवाडी, घारापुरी किनाऱ्यावर कचऱ्याचा ढीग

गेल्या काही दिवसांपासून उरणच्या किनाऱ्यावर काळ्या पाण्याच्या लाटा वाहू लागल्या आहेत. या लाटांमधून किनाऱ्यावर तेल तवंग वाहून येऊ लागला आहे. समुद्रातील कचराही मोठय़ा प्रमाणात किनाऱ्यावर येऊ लागला आहे. त्यामुळे किनारे काळवंडू लागले आहेत. याचा परिणाम किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर आणि मच्छीमारांवर झाला आहे. घारापुरीच्या किनाऱ्यावरही असेच तवंग दिसू लागले आहेत.

अरबी समुद्रातून सध्या मोठय़ा प्रमाणात महाकाय जहाजांची वर्दळ सुरू आहे. येथील जेएनपीटीसह चार बंदरातून दररोज अनेक जहाजे मालवाहतूक करतात. त्यांचे तेलही समुद्रात सांडलेले असते. तसेच याच बंदरातून तेलासह इतर रसायनिक पदार्थाची आयात केली जाते. ही तेलाची जहाजेही समुद्रातून ये-जा करीत असताना तेल सांडते. त्याचाच परिणाम होऊन समुद्रातील पाण्यावर तवंग निर्माण होतो. नंतर तो लाटांद्वारे किनाऱ्यावर येतो. अशाच प्रकारचे तेल सध्या उरणच्या पिरवाडी, केगाव व घारापूर बेटावरही येऊ लागले आहे. त्यामुळे मासेमारीवरही परिणाम झाल्याची माहिती दांडा येथील मच्छीमार भारत पाटील यांनी दिली. या तवंगांमुळे किनाऱ्यावरील पिण्याचे पाणीही दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

किनाऱ्यांची पाहणी करण्यात येईल. तेलाचे तवंग वाहून आले असल्यास त्यांचे नमूने घेतले जातील. त्यांची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. एखाद्या जहाजातून तेल सोडण्यात आले असू शकते.

– राहुल मोटे, नियंत्रक, उरण पनवेल प्रदूषण नियंत्रक मंडळ