‘ड्रेन लॉक’ तुटलेल्या गाडय़ांतील घाण पाणी, कचरा रस्त्यावर 

स्वच्छतेबाबत कठोर भूमिका घेत नागरिक व सोसायटय़ांना शिस्त लावणाऱ्या पालिका प्रशासनाचे कचरा वाहतुकीतील बेशिस्तीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. शहरात कचरा संकलन करणाऱ्या गाडय़ाच अस्वच्छता पसरवत आहेत. काही गाडय़ांचे ड्रेन लॉक तुटल्यामुळे घाण पाणी व कचरा रस्त्यावर पडत आहे.

महापालिका सुरुवातीला घंटागाडीद्वारे कचरा संकलन करीत होती. त्यानंतर स्थानिक ठेकेदारांच्या मदतीने कचरा उचलला जात होता. त्यामुळे उघडय़ा गाडय़ांमधून अनेक वेळा कचरा रस्त्यावर पडून दरुगधी पसरत होती. मात्र आता पालिका कचरा संकलनाबाबत काटेकोर नियोजन केले आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या गाडय़ांमध्ये वेगवेगळ्या वेळात संकलन केला जातो. मात्र कचरा संकलन करणारे मोठे कॉम्पॅक्टर ज्या ठिकाणी उभे राहतात. त्या ठिकाणी गाडय़ांचे ड्रेन लॉक तुटल्यामुळे या ओल्या कचऱ्यातील घाण पाणी रस्त्यावर पडते. त्याचा दर्प सर्वत्र पसरत आहे. या दरुगधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

कचरा वाहतूक करणाऱ्या गाडय़ांतून घाण पाणी रस्त्यावर पडते. त्यामुळे खूप वास येतो. पालिकेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी संदेश कदम या नागरिकाने केली आहे. या निष्काळजीपणाबद्दल कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.

शहरातून जमा होणारा

  • कचरा : ७१० टन
  • ओला कचरा : ३५० ते ४०० टन
  • सुका कचरा : २५० टन
  • एकत्रित येणारा कचरा : ६० टन
  • कचरा संकलन करणाऱ्या मोठय़ा गाडय़ा : ६९
  • पिकअप व्हॅन : ५०

कचरा संकलन करणाऱ्या गाडय़ांमधून जर घाण पाणी रस्त्यावर पडत असेल तर याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात येतील. परंतु नागरिकांनीही ओला कचऱ्यामध्ये पाणी राहणार नाही, याची काळजी घ्यावी.    – राजेंद्र सोनावणे, मुख्य स्वच्छता अधिकारी