देखभाल दुरुस्तीसाठी सर्वसमावेशक ठेक्याची प्रतीक्षा

वंडर्स पार्क, रॉक गार्डन, ज्वेल ऑफ नवी मुंबई अशा नावाजलेल्या उद्यानांसह नवी मुंबईत छोठी-मोठी जवळपास १६५ उद्याने उभारण्यात आली आहेत. ती नवी मुंबईकरांचा ‘श्वास’ बनली आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ती भकास होऊ नयेत अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी वाढत्या समस्या दिसत आहेत.

बहुतेक उद्यानांमध्ये मुलांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तर अनेक ठिकाणी ‘ओपन जिम’ ही संकल्पना राबवली आहे. त्यामुळे उद्यानांमध्ये नागरिकांचा राबता नेहमीच पाहायला मिळतो. परंतु काही उद्यानांच्या नामफलकाचीच दुरवस्था पाहायला मिळते. नक्की या उद्यानाचे नाव काय? असा प्रश्न पडत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते.

नळ सातत्याने सुरू राहिल्यामुळे उद्यानांमध्ये पाणी साचते. अनेक उद्यानांमध्ये आकर्षित खेळणी तसेच मिनी ट्रेन आहेत. पालिका आयुक्त बंगल्याला लागूनच असलेल्या रॉक गार्डनमध्ये अनेक महिन्यांनंतर नुकतीच ट्रेन सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी अद्याप ट्रेन सुरू झाली नाही. शहरात वंडर्स पार्क, रॉक गार्डन, वाशीतील मिनीशिशोरजवळील उद्यानात ट्रेन असून त्यांच्याकडे देखभालीकडे लक्ष देण्याची गरज आहे. २० ठेकेदारांकडे विविध उद्यानांची देखभाल दुरुस्ती असताना स्वच्छता, नामफलक, मध्यरात्रीपर्यंत तरुणाईचा वावर याकडे दुर्लक्ष होत आहे.

सर्वसमावेशक ठेका

शहरात परिमंडळ १ व परिमंडळ २ मिळून जवळजवळ २० ठेकेदार आहेत. तरीही दुर्लक्ष होत असल्याने आता पालिकेने सर्वसमावेशक ठेका देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आता फक्त परिमंडळ १ व २ मध्ये प्रत्येकी १ असे सर्वसमावेशक ठेके दिले जणार आहेत. लवकरच निविदा निघणार आहे.

उद्यान की मैदान?

शहरात काही ठिकाणी उद्यान की मैदान यावरूनच वाद आहेत. सानपाडय़ातील बाबू गेनू उद्यानाच्या भूखंडावरून असा वाद सुरू आहे. हा भूखंड उद्यानाचा असताना पालिकेने येथे बाबू गेनू मैदानाचा फलक लावला आहे.

शहरातील उद्याने चांगली असून देखभाल दुरुस्तीसाठी योग्य काळजी घेत आहेत. सर्वसमावेशक ठेक्यामुळे देखभाल दुरुस्ती अधिक चांगल्या प्रकारे होईल, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. उद्यानांचे खराब झालेले नामफलक तात्काळ दुरुस्त करावेत अशा सूचना अभियंता विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील काही ठिकाणच्या मिनी ट्रेन १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

– नितीन काळे, उपायुक्त उद्यान विभाग