लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात महापालिका कचऱ्यापासून गॅसनिर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. तुर्भे येथील कचराभूमीवर या प्रकल्पाचे नियोजन असून १५० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करण्यात येणार आहे.

शहरात सध्या स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. या नवीन प्रकल्पाची भर पडल्यास या अभियानात गुणांकन वाढविण्यातही याची मदत होणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

नवी मुंबई शहरात दररोज ६९६.३०९ मेट्रिक टन कचरानिर्मिती होते. ओला व सुका कचरा विघटन करून कचरा वाहतूक वाहनांतून तो तुर्भे येथील कचराभूमीवर टाकला जातो. पालिकेने कोपरखैरणे येथील कचराभूमी बंद करून त्या ठिकाणी निसर्ग उद्यानाची निर्मिती केली आहे. तर तुर्भे येथील कचराभूमीवर ओल्या कचऱ्यापासून पालिका खतनिर्मिती करीत आहे. तर सुक्या कचऱ्यापासून रस्ता डांबरीकरणासाठी वापरण्यात येणारे मिश्रण तयार केले जात आहे.

आता पालिकेने ओल्या कचऱ्यापासून गॅसनिर्मिती करण्याचे नियोजन केले आहे.  शहरासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून यातून निर्माण होणारा गॅस नवी मुंबई परिवहन परिवहन उपक्रमासाठी व इतर वाहनांसाठीही वापरण्यात येणार आहे. याबाबत लवकरच निविदा प्रक्रियाही राबवली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी दिली.