नगरपालिकेच्या कार्यालयांमध्ये विजेचा वापर

उरण : उरणसह अनेक शहरांतील तसेच गावातील घनकचऱ्यांच्या विल्हेवाटीच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. यावर उपाययोजना म्हणून उरण नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पात घनकचऱ्यांची विल्हेवाट लावल्यानंतर तयार होणारी वीज ही कार्यालयातील दैनंदिन कामासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या कार्यालयातील वीज देयकेही भागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. त्याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे  रोगराईही पसरू लागली आहे. कचरा उचलण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. असे असले तरी त्याची विल्हेवाट लागत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नगरपालिकेकडून कचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यासाठी घनकचऱ्यांवर प्रक्रिया करून त्यापासून जैवइंधन (बायोगॅस) तयार केले जाणार आहे. या जैवइंधनापासून विजेची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी रोज चार टन ओला कचरा लागणार आहे. तो पालिका क्षेत्रातून गोळा केला जाणार आहे. नगरपालिका कार्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या जैवइंधन प्रकल्पात प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी ३० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा प्रकल्प येत्या २० दिवसांत तयार होणार आहे. प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेचा वापर हा नगरपालिकेच्या कार्यालयात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.