क्षयरोगाच्या निदानासाठी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात ४९ ठिकाणी जीन एक्स्पर्ट मशीन सुरू आहेत. अशाच पद्धतीचे केंद्र कामोठे एमजीएम रुग्णालयात सुरू करण्यात येईल आणि त्यामुळे कोकण विभागातील रुग्णांना येथील जीन एक्स्पर्ट यंत्रणेमुळे तत्काळ निदान करणे सोयीचे होईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रुग्णालयात झालेल्या क्षयरोग परिषदेत केली. पनवेल व सिडको वसाहतींमधील क्षयरोगाच्या संशयित रुग्णांना कामोठे येथे जीन एक्स्पर्ट मशीनचे कक्ष सुरू झाल्यास क्षयरोगाचे वेळीच विनाशुल्क अचूक निदान करता येईल.
दोन दिवसीय क्षयरोग परिषदेत क्षयरोगाची नवीन आव्हाने, घ्यायची काळजी आणि नियंत्रणावर उपाययोजना या विषयांवर चर्चासत्र झाले. सांगता समारंभा वेळी डॉ. सावंत यांनी आपली मते मांडली. राज्यात सरकारी वैद्यकीय सेवेमध्ये न्युरोसर्जन व छातीच्या निगडित असणाऱ्या आजारांवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर (सीव्हीटीएस) यांचे प्रमाण कमी असल्याकडे डॉ. सावंत यांनी उपस्थित डॉक्टरांचे लक्ष वेधले. येत्या चार वर्षांत सरकारी वैद्यकीय सेवेत या डॉक्टरांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढावी यासाठी आरोग्यमंत्री प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. या परिषदेत एमजीएमचे संस्थापक डॉ. कमलकिशोर कदम, संचालक सुधीर कदम, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार हे उपस्थित होते.

आरोग्यमंत्री अनभिज्ञ..
परिचारिका शिक्षणक्रमासाठी एमजीएम रुग्णालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या घेणाऱ्या ४० विद्यार्थिनींना अन्नातून झालेल्या विषबाधेविषयी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले.रुग्णालयाच्या कॅन्टीनचालकाने पोलिसांना विषबाधेचे कोणतेही पुरावे मिळू नये, म्हणून २८ तास हे प्रकरण दूर ठेवले. त्या दरम्यान अन्नाचे नमुने कॅन्टीनचालकाने नष्ट केले. दोन दिवसांच्या उपचारानंतर विषबाधा झालेल्या ४० विद्यार्थिनीना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. शनिवारी एकीकडे आरोग्यमंत्री डॉ. सावंत एमजीएम व्यवस्थापनाची बाजू स्पष्ट करत असताना एमजीएमच्या कॅन्टीनमधील अन्न खाल्याने सानपाडा येथील एमजीएम वसतिगृहात राहणाऱ्या दोन मुलींना विषबाधा झाली. या दोन मुलींवर एमजीएम कामोठे येथे उपचार सुरू आहेत. सानपाडय़ातील वसतिगृहात कामोठे येथील एमजीएमच्या कॅन्टीनमधून अन्न पुरवले जाते. डॉ. सावंत एमजीएम व्यवस्थापनाच्या कार्याची स्तुती करत होते. तर दुसरीकडे विषबाधेमुळे उपचार घेत असलेल्या दोन विद्यार्थिनींबाबत आरोग्यमंत्री अनभिज्ञ होते.