सीमा भोईर, पनवेल
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. खारघरमधील एका हॉटेल मालकाने पाकिस्तानवरील राग व्यक्त करण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. पाकिस्तान मुर्दाबाद म्हणा व हॉटेल बिलावर १० टक्के सूट मिळावा अशी अनोखी ऑफर या हॉटेल मालकाने दिली असून या ऑफरला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या गुरुवारी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्याने हल्ला केला. या हल्ल्यात 41 जवान शहीद झाले. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्य यांच्या मदतीने हा हल्ला घडवला, अशी माहिती सैन्याने दिली आहे. यानंतर पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त असून पाकवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पुलवामा येथील घटनेनंतर खारघरमधील लकी तवा या उपहारगृहाचे मालक सय्यद खान यांच्या मनातही राग होता. हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवली. त्यांनी ग्राहकांसाठी एक ऑफर सुरु केली. पाकिस्तान मुर्दाबाद म्हणा व हॉटेल बिलावर १० टक्के सूट मिळवा, अशी ऑफर त्यांनी सुरु केली.
खान यांचे मांसाहारी उपहारगृह आहे. तिथं तंदुरी बिर्याणी, शोरमा, चायनीज असे विविध खाद्यपदार्थ मिळतात. पाकिस्तानवरील राग व्यक्त करण्यासाठी ग्राहकांनी खान यांच्या उपहारगृहात गर्दी केली आहे. पाकिस्तान मुर्दाबाद हा आवाज हॉटेल परिसरात घुमत आहे. ही ऑफर एका आठवड्यासाठी आहे.
पुलवामा येथे सीआरपीएफवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे आमच्या मनात खूप रोष होता, सैन्यात जाऊन आम्ही लढू शकत नाही, त्यामुळे आम्ही हा वेगळ्या पद्धतीने आमचा राग व्यक्त करीत आहोत, आम्ही भारतात राहतो, भारतावरचं आमचं प्रेम आहे, भारतात राहणारे मुस्लिम हे देशविरोधी नाही, आमच्या पुढच्या अनेक पिढ्या पाकिस्तान मुर्दाबादचं म्हणणार, असे खान यांनी सांगितले. ग्राहकांच्या पाकिस्तान मुर्दाबादच्या ग्राहक घोषणा देतात तेव्हा खान यांचे उपहार गृहातील कर्मचारी देखील घोषणा देत आहेत.
‘पाकिस्तान मुर्दाबाद म्हणा व हॉटेलबिलात १० टक्के सूट मिळवा अशी ऑफर आम्ही जेव्हा वाचली तेव्हा आम्ही या हॉटेलमध्ये गेलो. आम्हीही घोषणा दिल्या व १० टक्के ऑफर मिळवली, अशी प्रतिक्रिया हॉटेलमध्ये आलेले ग्राहक सुजित पाटील यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 4:38 pm