20 November 2017

News Flash

घणसोली अजूनही बेवारस!

प्रस्तावित नागरी कामांसाठी सिडको महापालिकेला ७२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी देणार होती.

वार्ताहर, नवी मुंबई | Updated: July 14, 2017 1:00 AM

  • हस्तांतरानंतरही पदपथ, रस्ते, मलनिस्सारणाच्या सुविधांचा अभाव
  • उघडी गटारे, नाल्यात गाळ, मोकळ्या भूखंडांवर दगड-माती..

घणसोली नोडचे सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतर होऊन आठ महिने उलटले तरीही हा नोड विकासापासून अद्याप वंचितच आहेत. रस्ते, गटारे, वीज, उद्याने, मलनिस्सारण वाहिन्या, मैदाने या प्राथमिक सुविधा देण्यात महापालिकेला यश आलेले नाही. हस्तांतरानंतर परिसराचा वेगाने विकास होईल, अशा आशेवर असलेल्या घणसोलीवासीयांच्या पदरी निराशाच पडली आहे. हस्तांतर ही केवळ औपचारिकताच ठरल्याची प्रतिक्रिया रहिवाशांत उमटत आहे.

प्रस्तावित नागरी कामांसाठी सिडको महापालिकेला ७२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी देणार होती. सार्वजनिक वापरासाठीचे भूखंडही पालिकेकडे वर्ग केले आहेत. बाजार आणि पार्किंगसाठी भूखंड सिडको उपलब्ध करून देणार होती. हस्तांतर होऊन आठ महिने उलटले, तरीही परिसरात रस्ते,गटारे, मलनिस्सारण वाहिन्या इत्यादी सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. सेक्टर १५, १६, ४, २१, गणेश टॉवर येथील गटारांवरील झाकणे गायब आहेत. पदपथांची दुरवस्था झाली आहे. पदपथांवरील मॅनहोल उघडे पडले आहेत. गटारांत पडून रहिवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पालिका  कराचे नेमके काय करते, असा प्रश्न घणसोलीतील रहिवासी करू लागले आहेत.

घणसोली विकासापासून दूरच

  • घरोंदा, सिंप्लेक्सचे रहिवासी समस्यांच्या गर्तेत

सिडकोने माथाडींसाठी ‘सिम्प्लेक्स’ आणि इतर सर्वसामान्यांसाठी ‘घरोंदा’ हे दोन गृहप्रकल्प घणसोलीत राबवले तेव्हा विविध सुविधांचे गाजर दाखविण्यात आले होते. नाल्यालगत जॉगिंग ट्रॅक, अद्ययावत उद्याने, चांगली मैदाने अशा सुविधा पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र सिडकोच्या दिरंगाईमुळे सर्व सुविधा कागदावरच राहिल्या आणि रहिवाशांची निराशा झाली. आता नोड हस्तांतरीत झाल्यानंतर तरी विकास होईल, अशी आशा या परिसरातील रहिवाशांना होती, मात्र प्रत्यक्षात ही अपेक्षाही फोल ठरली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेनंतर शासन निर्णयानुसार नवी मुंबईतील विकसित नोडचे हस्तांतर महापालिकेकडे करण्यात आले. त्यामध्ये ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरुळ व सीबीडी बेलापूर यांचा समावेश होता, परंतु घणसोली नोड अविकसित असल्याने तो हस्तांतरित करण्यात आला नाही. तेव्हापासून हा नोड हस्तांतरीत होईपर्यंत विकास शुल्काच्या नावाखाली सिडको तर सुविधांच्या नावाखाली महापालिका रहिवाशांकडून कर वसूल करीत होती, मात्र सुविधा काहीच मिळत नव्हत्या. गेल्या १५ वर्षांत या नोडची (सेक्टर १ ते १६) लोकसंख्या लाखाच्या घरात गेली, मात्र त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा दोन प्रशासनांच्या हस्तांतरवादात अडकल्या होत्या. अखेर १४ डिसेंबर, २०१६ ला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हस्तांतराच्या करारावर सह्य केल्या. त्यामुळे घणसोली नोडच्या विकासाची स्वप्ने रहिवासी पुन्हा पाहू लागले, मात्र हे स्वप्न पूर्ण झालेच नाही.

रस्ते, पदपथ, उद्याने या येथील गंभीर समस्या आहेत. सेक्टर-१५ मध्ये विजेचे खांब आहेत, मात्र त्यावर पथदिवे नाहीत. मैदाने व उद्यानांचा अभाव आहे. सेक्टर- ४ व ६ मध्ये विजेचे डीपी बॉक्स उघडे आहेत. महावितरणाचेही या भागाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पावसाळ्यात पादचाऱ्यांना विजेचा धक्का बसून अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कळसूबाई चौक येथील स्टेडियमचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्या भूखंडावर पावसाचे पाणी साचून तळे तयार झाले आहे. सेंट्रल पार्कचे काम संथगतीने सुरू आहे. सेक्टर- १५ येथील रस्त्यावर तळे साचले आहे. वाहनचालकांना खड्डय़ांतून मार्ग शोधावा लागत आहे. मोकळ्या भूखंडावर राडारोडा टाकण्यात आला आहे. पूर्वीपासून पालिकेकडेच असणाऱ्या सेक्टर- ४, ५, १, ६ मध्येही रस्ते, पदपथ यांची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे महापालिकेच्या कार्यकाळातही घणसोलीचे रहिवासी उपेक्षितच राहिले आहेत.

सांडपाणी खड्डय़ांत

घरोंदा व सिम्प्लेक्स जवळच्या नाळ्यातील गाळ न काढल्याने दरुगधी पसरली आहे. डासांमुळे साथीच्या रोगांची भीती व्यक्त होत आहे. सेक्टर ९, ७, ४ मधील रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे. सेक्टर १५, १६ येथ मलनिस्सारणाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. खड्डे खोदून त्यात सांडपाणी सोडण्यात येत आहे.

या नोडला सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नोडमधील रस्ते, मलनिस्सारण वाहिन्या, पथदिवे, गटारे, पदपथ या सुविधा पुरविण्यासाठी ९ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत तो सादर केला जाईल. उरलेल्या कामांसाठी टप्प्याटप्याने सुविधा पुरविण्यात येतील.

डॉ. रामास्वामी एन, आयुक्त, नवी मुंबई

घणसोली नोडमधील पार्किंग आणि बाजाराच्या भूखंडाबाबतची माहिती माझ्याकडे नाही. माझ्याकडे याबाबत माहिती आल्यावर कळविण्यात येईल.

मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको

First Published on July 14, 2017 12:58 am

Web Title: ghansoli development issue road problem drainage problem