उरण ते नवी मुंबई या मार्गाच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या मोठय़ा फलकांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. कोणतेही तारतम्य न बाळगता लावलेले हे फलक अपघातांना कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उच्च दाबाच्या वीजवाहिन्या, विजेचे टॉवर, जलवाहिन्या यांच्या शेजारीच हे अवाढव्य फलक लावले जात आहेत. त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. फलक वाऱ्यामुळे कोसळण्याची शक्यता असल्याने रस्त्यातून ये-जा करणाऱ्या वाहनांवर ते पडून अपघात होऊ शकतो. हे फलक वेळीच न हटवल्यास पावसाळ्यातील वादळी वाऱ्यामुळे ते पडण्याची भीती आहे. बेकायदा फलकबाजीविरोधात केवळ नियमच करण्यात येत असून त्यांची अंमलबजावणी मात्र तात्कालिक ठरत आहे.

शहरी आणि निमशहरी भागांत तसेच गावांतीलही गल्लीबोळांत  फलकबाजी केली जात आहे. नाके विद्रूप केले जात आहेत. राजकीय नेत्यांचे वाढदिवस, राजकीय कार्यक्रम, पूजा, क्रिकेटचे सामने, जाहिराती यांच्यासह विविध सणांच्या शुभेच्छांचे फलक कोणत्याही मोकळ्या जागेवर डकवण्यात येत आहेत. यात भर म्हणून सध्या लग्न व साखपुडय़ानिमित्तही भले मोठे बॅनर लावण्यात येऊ लागले आहेत. बेकायदा व शहरे विद्रूप करणाऱ्या बॅनरना हटविण्याचे आदेश अनेकदा न्यायालयाने दिले आहेत. त्यावर तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. पालिका नियम करतात आणि कारवाईही करतात, मात्र ती केवळ तात्कालिक ठरत आहे. काही दिवसांत पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे दृश्य निर्माण होत आहे.

प्रसिद्धीलोलूप राजकीय नेते आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्यामुळे फलक तयार करून देणाऱ्यांचे मात्र फावले आहे. फलक छापून देण्याबरोबरच, तो लावण्याची जागा, त्यानुसार योग्य आकाराची फ्रेम बनवून देणे अशा सर्व सोयी हे व्यावसायिक देऊ लागले आहेत. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जे काम पूर्वी रात्रीच्या वेळी ‘आपले काम’ म्हणून करीत होते त्यांचेही काम कमी झाले आहे. याचाच व्यावसायिक फायदा फलक बनवून देणारे घेत आहेत. परिणामी उरण परिसरातील सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महसूल विभागाच्या अखित्यारीत येणाऱ्या अनेक जागांवर भले मोठे फलक उभारण्यात आले आहेत.

उरणमध्ये सिडको आणि जेएनपीटीच्या माध्यमातून विकास होत आहे. यात प्रामुख्याने द्रोणागिरी नोडमध्ये तयार होत असलेले सिडकोचे नवे शहर व त्यातील बांधकाम व्यवसायिकांची कामे, त्यांच्या जाहिराती ही या परिसराची गैरज बनली आहे. त्यामुळे उरणमधील शहराच्या ठिकाणापासूनच अगदी काही फुटांच्या अंतरावरच हे फलक उभारले जात आहेत. फलक उभारताना येथील स्थानिकांना हाताशी धरून त्यांना काही वाटा दिला जातो. त्यामुळे फलक लावण्याचे काम सुरू असताना स्थानिकांचे काम सुरू आहे, असे भासविले जाते आणि निर्धास्त होऊन फलकबाजी केली जाते.

या फलकांसाठी काही स्थानिकांना भाडेही दिले जाते. त्यामुळे फलक उभारणाऱ्यांना येथील स्थानिकांचीही साथ मिळू लागली आहे. आजही रस्त्यांपासून काही फुटांवर फलक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पादचारी आणि वाहनांतून ये-जा करणाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. एकीकडे रस्ते सुरक्षा सप्ताह साजरे केले जात असताना रस्त्याच्या कडेवरच उभ्या ठाकलेल्या संकटांकडे मात्र डोळेझाक केली जात आहे. हे बेकायदा फलक वेळीच न हटवल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या बेसुमार आणि बेकायदा फलकबाजीवर कधी आणि काय कारवाई होणार, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काय, असे अनेक प्रश्न सामान्यांना पडले आहेत.

खारफुटींवर अतिक्रमण

अनेक ठिकाणी खारफुटीची कत्तल किंवा नुकसान करून जाहिरातबाजी केली जात आहे. खारफुटीच्या भागांत किंवा दलदलीत उभारण्यात आलेल्या फलकांना मजबूत पाया मिळत नाही. त्यामुळे ते कोसळण्याची आणि अपघात होण्याची शक्यता आहे. या विभागांच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीस हे कसे पडत नाही, असा प्रश्न स्थानिक, पादचारी आणि वाहनचालकांना पडत आहे. अनेक नागरिकांनीही या संबंधी तक्रारी केल्या असूनही संबंधित विभागांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने रहिवाशांत नाराजी आहे.

संबंधित प्रशासनांचे दुर्लक्ष

* उरण परिसरातील रस्ते सिडको, जेएनपीटी, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत आहेत. या रस्त्यांच्या कडेला हे फलक उभारले जात आहेत. यात बोकडविरा, चारफाटा, फुंडे महाविद्यालय, जेएनपीटी कामगार वसाहत, नवघर, करळ फाटा, दास्तान, जासई आदी भागांचा समावेश आहे. तरीही संबंधित विभागांचे याकडे दुर्लक्ष आहे.

* अशाच प्रकारचा एक फलक दोन वर्षांपूर्वी बोकडविरा येथील चौकात बसविण्यात आलेला होता. तो ऐन पावसाळ्यात रस्त्यातच कोसळला होता. हा फलक एका वाहनावर कोसळला होता. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यातून संबंधित प्रशासनांनी काहीही बोध घेतल्याचे दिसत नाही.