पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यातील सर्वात मोठय़ा घाऊक बाजारपेठेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राज्यातील काही बडे नेते आपले नशीब अजमावणार असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री व कोरेगाव मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माथाडी नेते शशिकांत शिंदे हे माथाडी, हमाल या विभागातून संचालक मंडळासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सहा महसुली विभागांतून बारा शेतकरी प्रतिनिधी या समितीच्या संचालक मंडळावर निवडून येणार आहेत. त्यासाठीही राज्यातील काही बडे नेते प्रयत्न करीत आहेत. १४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरले जाणार असल्याने तोपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारला एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक घेणे क्रमप्राप्त झाले आहे. सहकार विभागाने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून पुढील महिन्यात २९ फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची   प्रक्रिया सुरू झाली असून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी संचालकपदासाठी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे यापूर्वी तीन सत्रे संचालक राहिलेले आहेत, मात्र तोपर्यंत ते या राज्याचे कॅबिनेट मंत्री झालेले नव्हते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीसाठी मुंबईमधून अर्थात तुर्भे येथील एपीएमसी बाजारातून सहा संचालक निवडून जाणार आहेत. यात कांदा बटाटा लसूण, भाजी, फळ, धान्य आणि मसाला बाजारातून प्रत्येकी एक संचालक राहणार असून या बाजारात गेली अनेक वर्षे काम करणारे माथाडी, हमाल, कामगारांमधून एक संचालक निवडला जाणार आहे. या पाचही बाजारांवर महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटनेचे वर्चस्व आहे. माजी मंत्री शिंदे व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील या दोन नेत्यांचे या संघटनेवर प्राबल्य आहे. राजकीय लपंडावामुळे या दोन नेत्यांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. संघटनेत दोन गट निर्माण झाले असून संचालक मंडळाच्या निवडणुकीत पाटील यांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची जास्त शक्यता आहे. भाजप सरकारच्या काळात पाटील यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरची जवळीक वाढली होती, मात्र लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी शिवसेनेबरोबर पाट लावल्याने ते दोन्ही पक्षांशी समान पातळीवर संपर्कात आहेत. त्यामुळेच भाजपची सत्ता जाऊनही त्यांचे महामंडळ अध्यक्षपद आजही अबाधित आहे. राज्य सरकार स्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहिल्याने शिंदे यांचे वजन वाढले आहे. त्यामुळे शिंदे यांना पाटील फारसा विरोध करणार नाहीत अशी चर्चा आहे. फळ बाजारात एकमताने संजय पानसरे यांना पाठिंबा दिला गेल्याने मंगळवारी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी या बाजारातील सर्व संघटनांची एक बैठक होऊन त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कांदा बटाटा बाजारात माजी संचालक अशोक वाळुंज यांना राजेंद्र शेळके हे टक्कर देण्याची शक्यता आहे. भाजी बाजारात माजी संचालक शंकर पिंगळे यांची के. डी. मोरे यांच्याबरोबर लढत होणार आहे. इतर दोन बाजारांतून एकमताने उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. सहा महसुली विभागांतून बारा शेतकरी संचालक म्हणून निवडून येणार असून यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हा नेते या निवडणुकीत उतरणार आहेत. पाच संचालक हे राखीव संवर्गातून राज्य शासनाकडून नियुक्त केले जाणार असून दोन संचालक हे मुंबई व नवी मुंबई पालिकेमधून नियुक्त होणार आहेत. पुढील महिनाभर राज्यातील या बाजार समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

६७ अर्ज दाखल

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवणुकीसाठी ६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २४ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १८७ अर्जाचे वाटप करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी मतदान चिन्हाचे वाटप केले जाणार आहे.