नवी मुंबईतल्या मॉडर्न शाळेत शिकणाऱ्या एका  विद्यार्थिनी भोवळ आली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केलं असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.  अभ्यासाच्या ताणामुळे मुलीला भोवळ आली असावी असा अंदाज वर्तवला जातो आहे.  सायली जगताप असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. सायली ही तुर्भे या ठिकाणी वास्तव्यास होती. मंगळवारी सकाळी चाचणी परीक्षा असल्याने ती घाईनेच शाळेत आली. शाळेत आल्यावर वर्गाच्या बाहेर दप्तर ठेवत असतानाच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. वर्गात असलेल्या शिक्षकांनी तिला कार्यालयात आणले आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर त्यांनी सायलीला मनपा रुग्णालयात दाखल केले.

मनपा रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षाक प्रभाकर शिउकर यांनी माहिती दिली. सायलीला दोन बहिणी आणि एक भाऊ असून तिचे वडील वाशीच्या विष्णुदास बावे नाट्यगृहात प्रकाश योजनेचे काम पाहतात. सायलीला कोणताही आजार नव्हता. तरीही तिचा मृत्यू कसा झाला? हे समजू शकलेले नाही. सायलीचे वडील व्यक्तीगत कामाने सोलापूरला गेले होते. त्यांना मुलीच्या निधनाचे मृत्यूचे वृत्त समजताज ते तातडीने नवी मुंबईत दाखल झाले. या घटनेने सायलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.