कामोठे वसाहतीमधील एका नऊवर्षीय मुलीला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या अल्पवयीन मुलाला चोप देणाऱ्या या मुलीच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना शुक्रवारी घडली. मारहाणीत या मुलाचा हात मोडल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे, मात्र ही मुलगी पोलिसांची असती तर अशी कारवाई केली गेली असती का, असा प्रश्न विचारला जात आहे.
सकाळी आठ वाजता बिस्कीटचा पुडा खरेदी करण्यासाठी इमारतीखालील दुकानात गेलेल्या या मुलीला शेजारी असणाऱ्या नाभिकाच्या दुकानातील मुलाने बोलावले. ही मुलगी तेथे गेली असता या मुलाने तिच्याकडे पाहून अश्लील चाळे केले. घाबरलेली ती मुलगी धावत घरी गेली. तिचे वडील रुग्णालयात उपचार घेत असल्याने घरी तिची आजी होती. कालांतराने तिच्या अन्य नातेवाईकांना ही घटना समजली. या मुलीची आत्या व अन्य संतप्त नातेवाईकांनी नाभिकाला जाब विचारत त्याच्या दुकानाची तोडफोड केली तसेच संबंधित मुलाला बेदम चोप दिला. या मारहाणीत त्याच्या हाताचे हाड मोडले. यानंतर या मुलाला घेऊन या सर्वानी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणी हा मुलगा तसेच मुलीचे नातेवाईक अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. हा मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला बाल कल्याण समितीसमोर हजर केले. वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशहून पोट भरण्यासाठी हा मुलगा येथे आल्याचे समजते. या मुलाला मारहाण करणाऱ्या नातवाईकांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी दिली. कोणतीही चुकीची घटना घडल्यास कायदा हातात न घेता पोलिसांकडे धाव घ्या, असे आवाहन त्यांनी केले. मात्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ही मुलगी पोलिसांची असती तर पोलिसांनी अशी कारवाई केली असती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2015 7:33 am