News Flash

घराचे हप्ते भरण्यास आणखी मुदतवाढ द्या!

सिडकोच्या महागृहनिर्मितीतील घरांचे हप्ते भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून ती आता चार दिवसांत संपणार आहे.

घराचे हप्ते भरण्यास आणखी मुदतवाढ द्या!

एकही हप्ता भरू न शकलेल्या लाभार्थीची मागणी

नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्मितीतील घरांचे हप्ते भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून ती आता चार दिवसांत संपणार आहे. मागील काही महिन्यांत घर मिळालेल्या लाभार्थीच्या उत्पनात तसेच देशाच्या एकूणच आर्थिक स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. बेरोजगारांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. त्यामुळे सिडकोने घरांचे उर्वरित हप्ते भरण्याची आणखी तीन महिने मुदतवाढ द्यावी अशी लाभार्थीची मागणी आहे.

सिडकोने एक जुलैपासून सर्व हप्ते भरलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली आहे पण या घरातील अनेक अंतर्गत कामे अपूर्ण असून ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे या मुदतवाढीमुळे सिडकोलाही ही कामे करण्यास मुदत मिळणार आहे.

सिडकोने तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये सुमारे २५ हजार घरांचे बांधकाम सुरू केले आहे. तेवढय़ाच घरांची सोडत ऑक्टोबर २०१८ पासून काढण्यात आलेली आहे. यातील चार हजार घरांचा ताबा सिडको ऑक्टोबर २०२० मध्ये देणार होती, मात्र याच वर्षी मार्चमध्ये देशात करोनाचा कहर सुरू झाला. त्यामुळे सिडकोचे या घरांचे बांधकाम ठप्प झाले आणि ऑक्टोबरमध्ये घरांचा ताबा देता आला नाही. त्यामुळे सिडकोने नंतर डिसेंबर २०२० ही मुदत दिली. तोपर्यंतही करोना स्थिती आटोक्यात न आल्याने ही मुदत नंतर मार्च २०२१ व त्यानंतर मे २०२१ अशी जाहीर करण्यात आली. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सिडकोला जून व जुलैमध्ये ताबा देण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागले. ते सिडकोने पाळले असून एक जुलैपासून टप्प्याटप्प्याने ताबा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र ताबा देण्यात आलेल्या ग्राहकांची नाराजी असून घरातील अनेक कामे प्रलंबित असल्याच्या तक्रारी वाढू लागलेल्या आहेत.

वीज जोडणी, शौचालयातील अंर्तगत कामे, पाणी, कडी कोयंडे अशा छोटय़ा मोठय़ा तक्रारी ग्राहक करू लागले आहेत. सिडकोने कोविड काळ पाहता या एक वर्षांत घरांचे हप्ते न भरणाऱ्या ग्राहकांचा दंड माफ केलेला आहे तर घराचा एकही हप्ता किंवा काही हप्ते प्रंलबित असलेल्या लाभार्थीना ३१ जुलै ही शेवटची मुदत ही रक्कम भरण्यास दिलेली आहे.

ही मुदत आता चार दिवसांनी संपणार असून यानंतर हप्ते न भरणाऱ्या ग्राहकांचे घर रद्द करण्याची कारवाई सिडको करू शकणार आहे मात्र इतर काळापेक्षा हा काळ वेगळा असून ३१ जुलैपर्यंत हप्ता न भरणाऱ्या किंवा काही हप्ते शिल्लक असलेल्या लाभार्थीची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे असे चित्र नाही. करोनाचे संकट आजही घोंघावत असून तिसऱ्या लाटेमुळे अनेकांच्या मनात भीती आहे.

महागाई, बेरोजगारी, आरोग्य, अस्मानी संकट, पूरस्थिती अशा अनेक कारणांमुळे अनेक लाभार्थी घर घेण्याची इच्छा असूनही घर घेऊ शकणार नाही. त्यामुळे एकही हप्ता न भरलेल्या लाभार्थीची कैफीयत ऐकून घ्यावी आणि किमान आणखी एक मुदतवाढ देण्यात यावी असे साकडे अनेक लाभार्थीनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घातले आहे. ही मुदतवाढ करोना स्थिती पूर्ववत येत नाही तोपर्यंत दिल्यास या लाभार्थीवर सरकारचे उपकार होतील असेही काही लाभार्थीनी स्पष्ट केले आहे.

सिडकोचे घर मिळावे यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करीत होतो. ते लागल्यानंतर पाहिल्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा पल्लवित झाली. मात्र करोनाने या सर्व स्वप्नावर पाणी फेरले आहे. घरांचा एकही हप्ता भरला नाही त्यांनाही घरांचे हप्ते भरेन असा आशावाद आहे. पण ज्यांनी एक दोन हप्ते भरले आहेत त्यांचे घरांसाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत असे स्पष्ट होते. अशा वेळी सिडकोने आणखी मुदतवाढ देऊन घराचे स्वप्न पूर्ण करण्याची लाभार्थीना संधी द्यावी

– प्रशांत बारशिंग, लाभार्थी, खारघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 1:24 am

Web Title: give more time to pay the house installments ssh 93
Next Stories
1 खोदकामांमुळे उद्योजक हवालदिल
2 कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित
3 १५ दिवसांत ९७ हजार चाचण्या
Just Now!
X