वाशी सेक्टर-६ येथील मराठी साहित्य संस्कृती कला मंडळाच्या सभागृहात शनिवारी एसआरएम प्रस्तुत आणि रोबोटेक यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थी व पालकांची संध्याकाळी पाच वाजल्यापासून झुंबड उडाली होती.
करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी दहावी बारावीनंतर विविध विद्याशाखांतील पर्यायी अभ्यासक्रमांची माहिती दिली. दुसऱ्या सत्रात अभियांत्रिकी शाखेतील संधीची माहिती निवृत्त प्राध्यापक सुरेश नखारे यांनी करून दिली तर तिसऱ्या सत्रात वैद्यक क्षेत्रातील करिअर घडविताना येणाऱ्या समस्या व फायदाचा उलगडा केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी केला.
चौथ्या सत्रात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या परीक्षाबांबत आणि पुढील करिअर वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी तज्ज्ञांकडून शंकानिरसन करून घेतले.

प्रवेश घेताना निर्णय अचूक हवा
दहावी बारावीनंतर पुढे काय करायचे याचा विचार बहुतेक विद्यार्थी हे मिळालेल्या गुणांवर व मित्र कुठे प्रवेश घेणार आहे यावर ठरवतात. परंतु ही पद्धत चुकीची असून परीक्षेपूर्वीच करिअर निश्चित केले पाहिजे. प्रवेश घेताना निर्णय चुकला तर तो मागे घेता येत नाही. त्यामुळे करिअर निवडताना थोडाफार अभ्यास करून पावले उचलणे गरजेचे आहे. विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांमध्ये आपल्याला मोजक्याच संधीची माहिती आहे, परंतु कला वाणिज्य शाखेला जाऊनसुद्धा उत्तम करिअर करता येऊ शकते.
– विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक

उत्तम अभियंता होण्यासाठी ..
पाल्याचा निर्णय त्यांनाच घेऊ द्या, निर्णयप्रक्रियेमध्ये त्यांना पाठिंबा द्या, अशा शब्दांत व्हीजेटीआय महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक सुरेश नाखरे यांनी मार्गदर्शन केले. उत्तम अभियंता होण्यासाठी गणिताचा प्रभावी वापर, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, सहकार्याची भावना, जबाबदारीचे आत्मभान, चिकाटी, संशोधन वृत्ती, स्वयंप्रेरित स्वभाव, व्यवस्थापन कौशल्य हे गुण अंगी असणे गरजेचे आहे. मुलांच्या मोबाइल व इंटरनेटच्या वापरावर बंदी नको. तर त्यावर पालकांचे नियंत्रण असावे, असा सल्ला त्यांनी दिला.
– सुरेश नाखरे

वैद्यक क्षेत्रात सेवाभावी वृत्ती आवश्यक
राज्याची लोकसंख्या ११ कोटींवर पोहोचली असून सहाशे जणांमागे एका डॉक्टरची गरज आहे, मात्र हे प्रमाण साध्य झालेले नाही. सेवाभावी वृत्ती, अविरत कष्ट करण्याची तयारी आणि सामाजिक जबाबदारीतून हे क्षेत्र निवडल्यास आपण यशस्वी डॉक्टर होऊ शकाल, हा गुरुमंत्र डॉ. अविनाश सुपे यांनी दिला. राज्य व देशातील वाढलेल्या सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उत्तम शिक्षण दिले जाते असे नाही. त्यामुळे महाविद्यालय निवडताना तेथील सोयीसुविधा, रुग्णसंख्या याची माहिती घ्या, असे ते म्हणाले.
– डॉ. अविनाश सुपे,
केईएम रुग्णालय अधिष्ठाता

मुलांवर विश्वास ठेवा
अभ्यास करीत असताना मुलाना तणावाशी सामना करावा लागतो. पालकांनी मुलांवर विश्वास ठेवला तर ती यशस्वी होतील. घरामध्ये भीतीदायक वातावरणामुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे घरातील वातावरण खेळीमेळीचे असणे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. मुलांशी संवाद वाढल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास नक्की मदत होऊ शकते. योगासने, व्यायाम व पुरेशा झोपेमुळे मुलांच्या मनाचे आरोग्य चांगले राहते. मुले मोबाइल, इंटरनेट आदी गोष्टींच्या अधीन झाली असतील तर वेळीच समुपदेशकाचे मार्गदर्शन घ्यावे, असा सल्ला डॉ. हरीश शेट्टी यांनी दिला.
-डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ