नवी मुंबई पालिकेचा व्याप आणि विस्तार वाढत असल्याने विविध विभागांसाठी साडेतीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीला शासनाने मंजुरी द्यावी असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने नगरविकास विभागाला पाठविला होता. त्यातील वैद्यकीय विभागासाठी आवश्यक असलेल्या एक हजार ८५ जागांसाठी शासनाने हिरवा कंदील दर्शविला आहे.
त्यामुळे पालिकेचे बेलापूर, ऐरोली व नेरुळ येथील सार्वजनिक रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या एक हजार नोकरभरतीतील ३०० जणांची भरती यापूर्वीच झाली आहे, मात्र त्याला शासनाची मान्यता नव्हती.
नवी मुंबई पालिका क्षेत्राची लोकसंख्या दरवर्षी झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे वीस वर्षांपूर्वी असलेल्या ५७ प्रभागांची संख्या आता १११ प्रभागांत झाली आहे. त्यामुळे दोन हजार २०० अधिकारी व कर्मचारी संख्या असलेल्या पालिकेत आणखी साडेतीन हजार कर्मचारी भरतीसाठी मंजुरी देण्यात यावी असा एक प्रस्ताव माजी आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शासनाला दिला होता. त्यावर गेली दोन वर्षे चर्चा सुरू होती.
या साडेतीन हजार नोकरभरतीतील एक हजार ८५ नोकरभरतीला राज्य शासनाने शुक्रवारी मंजुरी दिली असून हे सर्व कर्मचारी वैद्यकीय सेवेतील आहेत. कमी कर्मचारी संख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण पडत असल्याची ओरड गेली अनेक वर्षे सुरू असून वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोन वेळा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यानंतर अग्निशमन दलात कमी कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांचीही तारेवरील कसरत सुरू आहे. यानंतर अतिक्रमण विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने शहरात बेकायदेशीर बांधकामांचे स्तोम वाढले आहे. याशिवाय मालमत्ता व उपकर विभागात कर्मचारी मागण्यात आले आहेत.

एक हजार ८५ कर्मचाऱ्यांच्या मंजुरीमुळे पालिकेची गेली दोन वर्षे रखडलेली तीन मोठी रुग्णालये सुरू होण्यास मदत होणार आहे. दोन वर्षे रखडलेला हा प्रस्ताव मंजूर करण्यास आपला पाठपुरावा कामी आल्याचा बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दावा केला आहे.