आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती
मागील चार वर्षांपासून इतर विभागांच्या परवानग्या आणि कंत्राटदाराला बांधकामाचे बिल मंजूर न झाल्याने रखडलेल्या बांधकामामुळे पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय वजा ट्रामा सेंटर यंदा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील एका कार्यक्रमावेळी डॉ. सावंत आले होते त्या वेळी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
२०१२ साली फेब्रुवारी महिन्यात आघाडी सरकारच्या काळात माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते या रुग्णालयाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा झाला. सुरुवातीला या रुग्णालयाचा प्रस्तावित आराखडा ३० खाटांचा होता. मात्र या परिसरात एकही सरकारी ट्रामा सेंटर नसल्याने शेट्टी यांनी ३० खाटांऐवजी १०० खाटांचे येथे रुग्णालय उभारण्याचा मानस व्यक्त केल्याने संपूर्ण आराखडा उद्घाटनाच्या वेळीच बदलण्याची आफत सार्वजनिक बांधकाम विभागावर आली.
त्यामुळे पुन्हा नव्याने प्रस्ताव व मंजुरीच्या कसरतीला आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला सामोरे जावे लागले. सध्याचे आरोग्यमंत्री सावंत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या रुग्णालयासाठी लागणारे साहित्य, यंत्र व वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची भरती सप्टेंबरपूर्वी करून हे रुग्णालय तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सावंत यांनी दिल्याने पुन्हा नव्या जोमाने सरकारी यंत्रणा रुग्णालयाच्या पूर्णत्वाच्या दिशेने पाहत आहे.
डॉ. सावंत यांच्या या आश्वासनामुळे सामान्य पनवेलकरांना लवकरच सरकारी दरात किफायतशीर दरात वैद्यकीय उपचार मिळतील अशी अपेक्षा आहे. या शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये २० खाटा या ट्रामा सेंटरसाठी असतील, तर त्यामध्ये जनरल, औषधे व शस्त्रक्रिया करणारे विविध फिजिशियन यांच्यासोबत बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतशल्य चिकिस्तक, फिजिओथेरपिस्ट, शल्यचिकित्सक येथे असणार आहेत. रुग्णालयामध्ये एक्सरे, रक्तपेढी, सीटीस्कॅन व सोनोग्राफी यंत्रे असणार आहेत. लहान ३ व मोठी २ अशी पाच शस्त्रक्रिया गृहे (ऑपरेशन थिएटर) आहेत. दुमजली या रुग्णालयात तळमजल्यावर शवागार, औषधालय व साहित्य ठेवण्यासाठी कोठाराची सोय आहे. तसेच ६ खाटांचे येथे अतिदक्षता विभाग आहे. सध्याच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मिळून १४ कर्मचारी संख्या आहे. आरोग्यमंत्री सावंत यांनी सप्टेंबर महिन्यापर्यंत वैद्यकीय सेवकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन कसे पार पडेल याविषयी त्यांच्याच विभागातून आश्चर्य व्यक्त होत आहे.