नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर विभागातील नेरुळ सेक्टर ५०, तुभ्रे विभागातील वाशी सेक्टर १८, ऐरोली विभागातील ऐरोली सेक्टर १८ येथील मलप्रक्रिया केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रथम वर्षांसाठी मंजुरी मिळाली. या प्रस्तावावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली होती. या प्रस्तावासाठी प्रथम वर्षांसाठी ९ कोटी ७२ लाख रुपये रकमेला मंजुरी देण्यात येऊन १ कोटी ५२ लाख रुपये कमी करून हा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देत सर्व सदस्यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

अत्याधुनिक सी टेक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचे प्रथम वर्षांसाठी नेरुळ, वाशी व ऐरोली येथे सुमारे ९ कोटी ७२ लाख रुपये प्रथम वर्षांसाठी देखभाल दुरुस्ती करण्याचे कंत्राट मंजुरीसाठी स्थायी समितीत सादर करण्यात आले होते. याला स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली. हा प्रस्ताव मागील दीड महिन्यापासून रेंगाळला होता. या प्रस्तावातील दर जास्त असल्याने विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. हा प्रस्ताव प्रशासनाला मागे घेण्यास भाग पाडून पुन्हा दुरुस्ती करून आणण्याचे स्थायी समितीच्या सदस्याने सूचित केले होते. त्यावर हा प्रस्ताव आयुक्तांनी मागे घेतला होता. अखेर गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्रिवार्षिकसाठी ३४ कोटी ३३ लाखांच्या प्रस्तावाची रक्कम प्रथम वर्षांसाठी कमी करून ९ कोटी ७२ लाख रकमेला मंजूर करण्यात आला. प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली असून यामुळे महानगरपालिकेचे १ कोटी ५२ लाख वाचल्याने सर्वपक्षीयांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. खिलारी इन्फ्रास्ट्रर प्रा. लि.ला यांचे कंत्राट देण्यात आले आहे.

अवाजवी खर्चाला चाप
महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पालिका आयुक्त दिनेश वाघमारे व स्थायी समितीच्या सभापतिपदी विराजमान झाल्यानंतर सभापती नेत्रा शिर्के यांनी प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याचे सुतोवाच केले होते. या प्रयत्नांमुळे एकाच कामावर केल्या जाणाऱ्या वाढीव खर्चाला चाप बसला आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीतून जाणारा वाढीव निधी कमी झाला असून पालिकेच्या तिजोरीत भर पडली आहे.