विकास महाडिक

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र; कल्याण, डोंबिवली, बदलापूर मुंबईच्या जवळ येणार

ठाणे-बेलापूर मार्ग व राष्ट्रीय महामार्ग चारला अधिक जवळ आणणारा ऐरोली-कल्याण मुक्त मार्गातील पहिल्या टप्प्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळाला आहे. ठाणे खाडीवरील ऐरोली-मुलुंड खाडी पुलावरील पूर्वेकडून सुरू होणाऱ्या या बारा किलोमीटर मार्गात मोठय़ा प्रमाणात कांदळवन, वन विभागाची वनसंपदा लागत आहे. त्यामुळे या मुक्त मार्गाला केंद्रीय तसेच राज्य शासनाच्या पर्यावरणविषयक परवानग्या आवश्यक होत्या.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या या मार्गामुळे कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर ही शहरे मुंबईच्या जवळ येणार आहेत. नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे शिळफाटा मार्गाने नवी मुंबई गाठताना अर्धा ते एक तास लागणारा वेळ या वाचणार आहे.

ऐरोली उपनगरातील अंतर्गत वाहतूक अलीकडे मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीला कितीही पर्याय काढले तरी ते कमी असल्याचे दिसून येत आहेत. मुलुंड, ऐरोली व वाशी खाडी पुलावरील आपत्कालीन डागडुजीमुळे तर ठाण-बेलापूर व पटनी मार्गावरील वाहतूक कोंडी अभूतपूर्व असल्याचा अनुभव वाहनचालकांना येत आहे. हीच स्थिती मुंब्रा शिळफाटा मार्गावरील असून या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दोन ते तीन तास वाहनचालकांना अडकून पडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पारसिक डोंगराच्या दोन्ही बाजूस होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर उपाययोजना आणि कल्याण, डोंबिवली व बदलापूर या शहरातील उद्योग वृद्धी व्हावी यासाठी राज्य शासनाने ‘एमएमआरडीए’ला ऐरोली खाडीपूल ते कटई नाका दरम्यान मुक्तमार्ग तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. बारा किलोमीटर मार्गाच्या या उभारणीला सुरुवात झाली असून ठाणे बेलापूर मार्गावरील सिमेन्स व भारत बिजली या कंपनींची भाडेपट्टय़ावर देण्यात आलेली जमीन संपादन प्रक्रिया पार पडली आहे. या दोन कंपनीपासून साडेतीन किलोमीटर लांबीचा पारसिक डोंगरातून एक बोगदा काढला जाणार आहे. त्याअगोदर ऐरोली खाडीपूल ते भारत बिजलीपर्यंत बांधण्यात येणाऱ्या दोन किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाला लागणारे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र ‘एमएमआरडीए’ला मिळाले आहे. ठाणे खाडी पुलापासून होणाऱ्या या बांधकामाला पर्यावरणविषयक परवानगी आवश्यक होती. ती मिळाल्यामुळे आता या टप्यातील कामाला सुरुवात होणार आहे. या संदर्भात एमएमआरडीएचे अभियंता प्रकाश साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

या मार्गामुळे कल्याण डोंबिवली, बदलापूर या भागातील उद्योग धंदे वाढीस चालना मिळणार असली तरी हा मार्ग कल्याण शिळफाटा मार्गावरील एका बडय़ा विकासकाच्या विस्तीर्ण अशा गृहनिर्माण प्रकल्पाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने निर्माण केल्याची चर्चा आहे.

साडेतीन वर्षांचा कालावधी

ऐरोली ते कल्याण शिळफाटा मार्गावरील कटई नाक्यापर्यंत हा १२. ३ किलोमीटर लांबीचा उन्नत मुक्त मार्ग बांधला जाणार आहे. त्यासाठी ९४४ कोटी रुपये अंदाजित खर्च होणार असून तो साडेतीन वर्षांत होईल असे अपेक्षित आहे. तीन टप्प्यात बांधल्या जाणाऱ्या या मार्गाचे ऐरोली ते भारत बिजली हा एक टप्पा तर भारत बिजली ते मुंब्रा बायपास हा दुसरा टप्पा राहणार आहे. त्यानंतर मुंब्राहून तिसरा टप्पा कटई नाक्याजवळ बांधण्यात येणाऱ्या मार्गाचा आहे.

चार किलोमीटरचा वळसा 

पारसिक डोंगर पोखरून १.७ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाणार आहे. या मार्गावरील हा पहिलाच बोगदा आहे. शिळफाटा मार्गासाठी डोंगरातून मार्ग काढण्यात आला आहे. साडेतीन वर्षांनंतर होणाऱ्या या मार्गामुळे शिळफाटा मार्गाचा चार किलोमीटर लांबीचा वळसा वाचणार असून वाहतूक कोंडी फुटणार आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर मार्गिका हवी

ऐरोली ते कल्याण कटई नाक्यापर्यंत बांधण्यात येणाऱ्या या मार्गात ठाणे तुर्भे रेल्वे मार्ग तसेच वसई-विरार-अलीबाग कॉरिडोर लागणार आहे. नवी मुंबई पालिकेने या मार्गात ठाणे बेलापूर मार्गावर चढ उतारासाठी मार्गिका ठेवण्याची सूचना केली आहे. हा सहा पदरी मार्ग आहे.