सदसत्वासाठी आग्रही सिडकोला न जुमानण्याचा नवी मुंबई स्पोर्टस् असोशिएशनचा निर्धार

जगभरातील फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा पुढील महिन्यात देशातील विविध शहरांत संपन्न होत आहेत. यातील आठ सामन्यांचे यजमानपद नवी मुंबई शहराला मिळाले असून एक उपांत्य सामनादेखील होणार आहे. मात्र असे असतानाही सिडकोने वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या मैदानासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले नसून कर्मचाऱ्यांना सभासदस्यत्व देण्याचा आडमुठेपणा कायम ठेवल्याचेच दिसून आले आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई स्पोर्टस् असोशिएनदेखील सिडकोला न जुमानता मैदान उभारण्यास सुरुवात केल्याने क्रीडा संकुल विरुद्ध सिडको असा सामना रंगला आहे.

या सामन्यांसाठी जगभरातून येणाऱ्या खेळाडूंना सराव करता यावा यासाठी सीबीडी, नेरुळ आणि वाशी येथे फिफाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सराव मैदाने तयार करण्यात येत आहेत. यातील दोन मैदाने पालिका तयार करत असून एक मैदान तयार करण्याची जबाबदारी वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशन या खासगी क्रीडा संकुलावर सोपविण्यात आलेली आहे. या क्रीडा संकुलाच्या विस्तीर्ण अशा मैदानावर १८० बाय २०० चौरस मीटर फुटबॉल सराव मैदान तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी एनएमएसए क्रीडा संकुलाने चार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. तर राज्य सरकार केवळ दहा लाख रुपये खर्च करणार आहे. यासाठी नवी मुंबई पालिकेने बांधकाम परवानगी दिली आहे. मात्र जमिनीचा मूळ मालक सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अट घातली आहे. त्याचबरोबर हे प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात नवी मुंबई स्पोर्टस असोशिएशन पुढे सिडकोतील शंभर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात सभासदत्व देण्याची अट घातली आहे. मात्र सिडकोने अनेक संस्थांना सामाजिक भूखंड दिले असून त्यांच्याकडूनही सिडको अशाच प्रकारे सदस्यत्व मागत आहे का, असा सवाल या संकुलातील सदस्यांचा आहे. त्यामुळे असोसिएशनच्या कार्यकारणीने सिडकोच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सभासदत्व देण्यास ठाम विरोध केला आहे. यासाठी एनएमएसएच्या कार्यकारिणी सदस्यांनी नुकतीच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची भेट घेऊन एनओसी देण्याची विनंती केली होती, पण सिडको आपल्या निर्णयावर ठाम असल्याने कार्यकारणीने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना साकडे घातले होते. त्यात राज्य शासनाच्या क्रीडा संचालकांनी लवकरात लवकर सराव मैदान उभारण्याचे आदेश दिल्यामुळे अखेर एनओसी विना हे काम प्रगतिपथावर आहे.

क्रीडा संकुलाला आर्थिक फटका

एनएमएसए क्रीडा सुंकुल हे नवी मुंबईतील एक नामांकित संकुल असून अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू या संकुलाच्या वतीने तयार केले गेले आहेत. त्याचप्रमाणे इनडोअर खेळ, तरण तलाव, अद्यावत व्यायामशाळा, रेस्टॉरन्ट, राहण्याची व्यवस्था, पार्किंग, भव्य मैदान यामुळे या असोशिएशनचे सभासदत्व मिळणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. शहरातील सर्वात जुन्या क्लबचे सध्याचे सदसत्व शुल्क पाच लाखापासून ते वीस लाखापर्यंत आहे. सिडकोच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे सवलतीच्या दरात सभासदत्व दिल्यास क्रिडा संकुलाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे ते इतर सभासदत्वावर अन्याय करणारे ठरणार आहे.

देशासाठी प्रतिष्ठेची स्पर्धा

फिफाच्या विश्वचषक स्पर्धे यंदा देशात खेळली जाणार असून नवी मुंबईतील नेरुळ येथील डी. वाय. पाटील अ‍ॅकडमीच्या स्टेडियम मध्ये यातील आठ सामने खेळले जाणार आहेत. त्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च करुन केवळ क्रिकेटसाठी बांधण्यात आलेल्या स्टेडियमधील मैदानाचे रुपडे बदलण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकष पूर्ण करणाऱ्या या सराव मैदानासाठी या स्पर्धेत खेळणाऱ्या एखाद्या संघाचे प्रायोजकत्व देऊन हा खर्च वसुल करुन देण्याचा फिफा प्रयत्न करणार आहे. यासाठी लागणाऱ्या परवानग्या तात्काळ देण्याचे आदेश केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने यापूर्वीच दिलेले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील या स्पर्धेवर लक्ष आहे. त्यामुळे पालिकेने सराव मैदान बांधण्याची तात्काळ परवानगी दिल्या आहेत. पण यात सिडकोचे ना हरकत प्रमाणपत्राचा अद्याप अभाव आहे.