वस्तू आणि सेवा कर शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशभरात लागू झाल्यानंतर जमीन तसेच मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसाठी जास्त कर मोजावा लागेल, या शक्यतेने पनवेल येथील साहाय्यक निबंधक कार्यालयात शुक्रवारी मोठी गर्दी उसळली होती. शनिवारपासून सामान्यांना सदनिका, गाळा तसेच जमिनींच्या कोणत्याही शिल्लक व्यवहारावर ‘जीएसटी’ तसेच विकासकांना ‘जीएसटी’सह ‘व्हॅट’चा कराचा बोजा पडू नये यासाठी विकासकांनी आणि सामान्य गुंतवणूकदारांनी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी एकच गर्दी केली.

सदनिका विकत घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सदनिका नावावर करण्यासाठी सकाळी आठ वाजण्याच्या पहिल्याच सत्रात रांगा लावून मुद्रांक शुल्क भरले. मागील दोन दिवसांपासून ही गर्दी पनवेलमधील विविध मुद्रांक नोंदणी शुल्क कार्यालयात पाहायला मिळत आहे. पनवेलमध्ये जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार थंडावलेले असले तरी इमारतींचे बांधकाम काही प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विचार करून सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री सात वाजेपर्यंत मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पनवेलमध्ये पाच ठिकाणी निबंधक कार्यालये खुले केली आहेत. शुक्रवारी नवीन पनवेल येथील एमटीएनएलच्या इमारतीमध्ये असणाऱ्या निबंधक कार्यालयात झालेल्या गर्दीतील गोंधळामुळे नागरिकांचे हाल झाले. त्यातच दोनदा वीजप्रवाह खंडित झाल्यामुळे नागरिकांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. याबाबत निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शनिवारपासून ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर नवीन कोणते वाढीव कर पद्धतीने मुद्रांक व नोंदणी शुल्क आकारावे याविषयीचे परिपत्रक सरकारने जाहीर केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

दलालांची दादागिरी

या वेळी निबंधक कार्यालयात दलालांचे वर्चस्व पाहायला मिळाले. पहिला नंबर माझ्या अशिलाचाच घ्या, अशी दादागिरी करण्यात येत होती. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील काचा जमावाच्या धक्काबुक्कीमध्ये फुटल्याने येथे गोंधळ निर्माण झाला होता. कार्यालयातील अधिकारी दलालांसमोर कसे हताश होत असतात हेसुद्धा शुक्रवारी नागरिकांना पाहायला मिळाले.