कळंबोली येथील एटीएम कॅश व्हॅनमधील सुरक्षारक्षक चक्क खोटी बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी एटीएम कॅश व्हॅनला सुरक्षा पुरवणाऱ्या एजन्सीकडे यासंदर्भातील माहिती मागवली आहे. एजन्सीच्या एटीएम कॅश व्हॅन सुरक्षारक्षकाकडे थोटी बंदूक आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

कळंबोली पोलिसांनी एटीएम कॅश व्हॅनला सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीचा खोटेपणा उघड केला आहे. लोअर परेल येथील सुरक्षा एजन्सीकडे कळंबोलीमधील एटीएम कॅश व्हॅनला सुरक्षा पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या कंपनीचे सुरक्षारक्षक चक्क एअरगन (जत्रेमध्ये फुगे फोडण्याच्या खेळात वापरली जाते तशी बंदूक) वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक माहिती अगदीच योगायोगाने समोर आली आहे हेही विशेष. कळंबोली पोलीस स्थानकामधील पोलीस निरिक्षक सतीश गायकवाड यांना एका पेट्रोल पंपवर सुरक्षारक्षक नसलेली एटीएम कॅश व्हॅन अढळली. त्यांनी या व्हॅनचालकाकडे अधिक चौकशी केली असता शहरामध्ये अशा सुरक्षारक्षकाशिवाय फिरणाऱ्या अनेक एटीएम कॅश व्हॅन असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पोलीस खात्याने अशाप्रकारच्या व्हॅनची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये एटीएम कॅश व्हॅनला सुरक्षा पुरवणाऱ्या ‘सिक्युअर व्हॅल्यू एजन्सी’चे सुरक्षारक्षक खोट्या बंदुका घेऊन एटीएम व्हॅनची सुरक्षा करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या व्हॅनच्या चालकाला आणि सुरक्षारक्षकाला चौकशीसाठी पोलीस स्थानकामध्ये घेऊन गेले. मात्र कारवाई करण्यात आलेल्या व्हॅनमध्ये किती पैसे होते आणि ती कुठे जात होती याबद्दलची माहिती पोलिसांनी दिली नाही.

या सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर आम्ही ‘सिक्युअर व्हॅल्यू एजन्सी’च्या व्यवस्थापकांना आठ दिवसात या गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. तसेच या एजन्सीशिवाय शहरामध्ये अशाप्रकारे एटीएम कॅश व्हॅन आणि एटीएम मशीनच्या सुरक्षेसंदर्भात बेजबाबदारपणे वागणाऱ्या इतर एजन्सी आहेत का याचा शोध घेत असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. दरोडा पडल्यास या एअरगनचा काहीच उपयोग नसल्याचे गायकवाड म्हणाले.

नियमांनुसार प्रत्येक एटीएम कॅश व्हॅनबरोबर एक शस्त्रधारी सुरक्षारक्षक असणे बंधनकारक आहे. एटीएम कॅश व्हॅन एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जात असली किंवा व्हेंडरकडून पैसे घेण्यासाठी जात असली तरी त्यामध्ये सुरक्षारक्षक असायलाच हवा असा नियम आहे. ‘याशिवाय एटीएम कॅश व्हॅनमध्ये ज्या ठिकाणी रोकड ठेवली जाते तिथे सीसीटीव्ही असणे आवश्यक असतं. अशाप्रकारे खोटी बंदूक घेऊन इतकी रक्कम घेऊन जाणे धोकादायक आहे. बंदूक खोटी असेल आणि चोरांनी हल्ला केला तर सुरक्षारक्षक केवळ पुतळा बनून सर्व प्रकार पाहू शकतो’ असं एक पोलीस अधिकारी म्हणाला.

आता पोलिसांच्या पत्राला संबंधित सुरक्षा एजन्सी काय उत्तर देते हे येत्या आठ दिवसांमध्ये कळेलच पण कळंबोलीमधील या प्रकरणावरुन उत्तर प्रदेशमधील ‘ठाय.. ठाय..’ प्रकरणाची नक्कीच आठवण होते. उत्तर प्रदेश पोलीस खात्यामधील सहाय्यक निरिक्षक असणार्या मनोज कुमार यांनी १२ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी चोरांबरोबर झालेल्या एका चकमकीमध्ये बंदूक बंद पडल्याने तोंडाने गोळ्यांचे आवाज काढले होते. कुमार यांचा ‘मारो.. मारो.. घेरो.. ठाय.. ठाय.. ‘ अशा आरोळ्या देतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. एकीकडे इंटरनेटवरुन यावरुन मिम्स व्हायरल झाले असतानाच पोलीस खात्याने मात्र योग्य वेळी तोंडाने आवाज काढून ‘शौर्य’ दाखवणाऱ्या कुमार यांना विशेष प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला होता.