नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या आठवडय़ात तीन वाहने भरून सापडलेल्या गुटखा प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून यात टोळीचा मुख्य सूत्रधार प्रमोद दास ऊ र्फ कल्लू याचाही समावेश आहे.

बेकायदा गुटखा विक्री करणारी मोठी टोळी पोलिसांच्या रडारवर होती. ८ ओक्टोबर रोजी रबाळे एमआयडीसी भागात केलेल्या कारवाई जितेंद्र दास, अखया खंडा, प्रियव्रत दास आणि मुन्ना यादव या चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडून ३५ लाख ५३ हजार ३१२ रुपयांचा विमल कंपनीचा गुटखा आढळून आला होता. यातील सूत्रधार व इतर आरोपी मात्र पसार होते. त्यातील दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आता सूत्रधार प्रमोद दास यालाही अटक करण्यात आली आहे.

गुजरात येथे गुटखा बंदी नसल्याने मोठय़ा प्रमाणावर प्रमोद दास हाच गुजरातहून गुटखा नवी मुंबईत आणत असे व येथून राज्यभरात पाठवत असे. तो अन्यत्र पळून जाण्याच्या मार्गावर आहे अशी खबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाला मिळाली होती. बुधवंत यांनी माहितीच्या आधारावर विमानतळावर पोलीस पथक साध्या वेशात रवाना केले. शनिवारी रात्रीपासूनच पोलीस पथक सापळा रचून होते. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास आरोपी विमानतळावर आला. पोलिसांनी खात्री होताच त्याला अटक केली.

आरोपी कल्लू याचा अनेक दिवसांपासून शोध सुरू होता. त्याचे साथीदार पकडले गेल्यावर त्यांच्याकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली आहे. गुटखा वितरणातील महत्त्वाची माहिती हाती लागेल.

– प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त गुन्हे शाखा