ऐरोली गावदेवी मैदानाच्या बाजूला असणाऱ्या ‘दिगंबर शांती हाऊस’ या सात मजली इमारतीवर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी कारवाई सुरू केली. ही कारवाई रोखण्यासाठी उच्च न्यायालयातून स्थगिती आणल्यानंतरही सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या अधिकांऱ्यानी कारवाई सुरू ठेवल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला. अखेर दुपारी एक वाजता ही कारवाई थांबवण्यात आली.
उच्च न्यायालयच्या आदेशानुसार सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे उभ्या असणाऱ्या इमारतीवर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई करीत आहे. सणासुदीच्या काळात ही कारवाई थांबवण्यात आली होती, मात्र सिडकोच्या अतिक्रमण पथकाने अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालवण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. ऐरोली नोडमध्ये अनधिकृतपणे बांधलेल्या ३१ इमारतींवर सिडकोने कारवाईला सुरुवात केली असून यातील आठ इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.
बुधवारी ऐरोली सेक्टर-२० येथील गावदेवी मैदानाच्या बाजूला असणाऱ्या ‘दिगंबर शांता हाऊस’ या इमारतीवर कारवाई करण्यासाठी सिडकोच्या अतिक्रमण पथकाचा फौजफाटा आला होता. या कारवाईला रहिवाशांनी विरोध करीत अनधिकृत इमारतीच्या बाजूने चारचाकी वाहने उभी करून कारवाईला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत व वाहने हटवून कारवाई सुरू केली. या वेळी नगरसेवक आकाश मढवी यांनी उच्च न्यायालयातून कारवाईला स्थगिती देण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र सिडकोचे अतिक्रमण अधिकारी मेनन यांनी हा आदेश हातात न घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार मढवी हे सिडको भवनमध्ये गेले असता तेथील अधिकाऱ्यांचाही वाईट अनुभव आला. सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे आदेश स्वीकारले, मात्र तोपर्यंत कारवाई सुरू झाली होती.
या संदर्भात सिडकोचे अतिक्रमणविरोधी अधिकारी मेनन म्हणाले की, या इमारतीला स्थगिती मिळाली ही बाब सत्य आहे, मात्र आम्ही कारवाईच्या ठिकाणी कागदपत्रे बघत नाही. त्यामुळेच संबंधितांना सिडको भवनात जाण्याची सूचना करण्यात आली.