|| पूनम सकपाळ

सहा डझनाला नऊ हजार रुपये दर

नवी मुंबई : अवकाळी पावसाचा फटका यंदा हापूसला बसला आहे. पावसामुळे हंगाम लांबणीवर पडल्याने वाशी बाजारात (एपीएमसी) हापूसच्या रोज पाच ते दहा पेटय़ा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंब्याचे दर चढेच आहेत.घाऊक बाजारातील ४ ते ६ डझनाचा दर पाच ते नऊ हजारांवर पोचला आहे. गेल्यावर्षी जानेवारीत वाशी बाजारात ५००च्या आसपास पेटय़ा दाखल झाल्या होत्या. यंदा घाऊकबाजारात चार ते सहा डझनात तीन ते पाच हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

दीडच महिन्याचा हंगाम

यंदाचा हापूसचा हंगाम जेमतेम दीड महिना राहण्याची शक्यता घाऊक फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केली. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये फळधारणा झालेला हापूस सध्या आहे. हापूसला नोव्हेंबरमध्ये पालवी फुटते. परंतु नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे डिसेंबरमध्ये येणारा मोहर फेब्रुवारीत येण्यास सुरुवात झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.