19 November 2019

News Flash

हवाबदलाने आरोग्य धोक्यात

सिडकोच्या जुन्या घरांमध्ये महिन्यातून धुरीकरण, औषध फवारणी, साठवणुकीच्या पाण्याची तपासणी होत होती.

डेंग्यू, स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वाढ; आजार निवारणासाठी पालिकेच्या उपाययोजना अपुऱ्या

डेंग्यू आणि स्वाइन आजारांना दूर ठेवण्यासाठी पालिकेच्या वतीने रुग्ण शोधक कारवाई सुरू करण्यात आली असली तरी वाढत्या सिडको वसाहतींमध्ये या मोहिमेत पालिका अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यातच शहराला खोकला आणि श्वसनाच्या विकारांनी हैराण केल्याचे चित्र आहे. बदलते हवामान आणि वायू प्रदूषणामुळे खासगी दवाखान्यांमध्ये सध्या खोकल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

सिडकोच्या जुन्या घरांमध्ये महिन्यातून धुरीकरण, औषध फवारणी, साठवणुकीच्या पाण्याची तपासणी होत होती. परंतु आता हे तीन ते चार मजली बांधकाम झाल्याने वरच्या मजल्यापर्यंत पालिका कर्मचारी पोहोचत नाहीत, त्यामुळे हा विभाग दुर्लक्षितच राहत आहे. या ठिकाणीही तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय साथीच्या रोगाचा प्रसार थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळ्च्या वेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. याची तपासणी सध्या सुरू आहे; परंतु यातून नव्याने उभारण्यात आलेल्या सिडकोच्या वसाहती दुर्लक्षित केल्या जात आहेत.

नवी मुंबई महानगर पालिका डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजना राबवीत असल्याचा दावा करीत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू, स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वाढ झाल्याचे समोर येत आहे.

बदलत्या हवामानामुळे हवेतील धुलीकण, वाहनांमुळे होणारे प्रदूषणाची मात्र वाढल्याने श्वसनाच्या विकारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. घशाला सूज येणे तसेच कफयुक्त खोकल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे. वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात बारुग्ण  विभागात रोज सुमारे दीड हजार रुग्ण तपासणीसाठी येत असून यात सर्वाधिक रुग्ण सध्या श्वसन विकार खोकल्याने त्रस्त असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

पालिकेकडून उपाययोजना

  •  डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूचे आजारही बळावत आहेत. महापालिका या आजारांना अटकाव आणण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा हाती घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यात रुग्ण शोधक कारवाई, १०० घरांअंतर्गत सफाई सर्वेक्षण, डास उत्पत्ती शोध मोहीम,  फवारणी, धुरीकरण, इत्यादी उपाययोजना करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • २०१७ मध्ये डेंग्यूचे एक हजार ९७ संशयित रुग्ण होते, तर त्यापैकी सहा जणांना डेंग्यूची लागण झाली होती, तेच २०१८ मध्ये ३४० संशयित त्यांपैकी चार डेंग्यू रुग्ण होते, तेच  २०१९ मध्ये आजवर २६० संशयिय रुग्ण होते, त्यांपैकी सहा जणांना लागण झाली होती. यांच्या सर्व उपचार झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
  • यंदा स्वाइन फ्लूचे ५६ संशयित रुग्णापैकी ४१ रुग्ण बाधित आहेत. यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांतही पाचने वाढ झाली आहे. आजवर पालिका रुग्णालयात मधुमेह रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना स्वाइन फ्लू लसीकरण देण्यात आले आहे.

सिडको वसाहतीतही प्रभागनिहाय डेंग्यू डासांच्या उत्पत्ती, प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागृती केली जाते. नित्याने घरोघरी जाणे शक्य होत नाही, मात्र ‘आशा वर्कर’ यांच्या माध्यमातून बाधित ठिकाणी माहिती देण्यात येते.  त्यामुळे नागरिकांनाही त्याची माहिती होते. प्रत्येक प्रभागात महिन्यातून एक ते दोन वेळा माहिती दिली जाते. – बाळासाहेब सोनवणे, वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई पालिका

बदलत्या ऋतुमानामुळे जलउपदंशचा (व्हायरल इन्फेक्शन) त्रास मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. या ऋतूत प्रतिकार शक्ती कमी असते. त्यात गारव्याने प्रदूषित हवा खालीच राहत असल्याने त्याचा परिणाम फुप्फुसांवर होतो. साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वछ ताजा आहार घेणे, रोज व्यायाम करणे वा डॉक्टरांचा सल्ला घेऊ न औषधे घेणे योग्य होईल. -डॉ. गजानन कुलकर्णी

First Published on November 6, 2019 1:00 am

Web Title: hazardous health risks akp 94
Just Now!
X