19 October 2019

News Flash

आरोग्यसेवा रुग्णशय्येवरच!

वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाबरोबर पालिकेच्या नेरुळ, बेलापूर, ऐरोली रुग्णालयातील आरोग्य सेवेचा खेळखंडोबा सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉक्टर-प्रशासन वाद; वाशीसह नेरुळ, बेलापूर, ऐरोली रुग्णालयांतील कामाकाजावर परिणाम

महापालिका प्रशासनाने १ मे रोजी प्रसिद्धिपत्रक काढून वाशीतील महापालिका रुग्णालयाचे कामकाज सुरळीत सुरू झाल्याचा दावा केला असला तरी अद्याप आरोग्यसेवा बिघडलेलीच आहे. गुरुवारी पुन्हा सर्वच पालिका रुग्णालयांतील डॉक्टरांनी निदर्शने केली. कारवाईचा धाक दाखवत आंदोलन दडपण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम केले.

वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाबरोबर पालिकेच्या नेरुळ, बेलापूर, ऐरोली रुग्णालयातील आरोग्य सेवेचा खेळखंडोबा सुरू आहे. या ठिकाणी फक्त नावापुरती बाह्य़रुग्ण तपासणी सुरू आहेत. डॉक्टरांची कमतरता असल्याने बहुतांश सेवा बंदच आहेत.

डॉक्टरांची कमतरता आणि ढिसाळ कामाचा फटका येथे येणाऱ्या गरीब रुग्णाच्या सेवेला बसला आहे. तीनशे खटांच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात केवळ ९६ जण उपचार घेत आहेत. फिजिशियन नसल्याने सर्जरी पूर्णपणे ठप्प आहेत. अपघात विभाग तर शिकाऊ  डॉक्टरांच्या भरवशावर सुरू आहे. औषधांची कमतरता तर आहेच. अतिदक्षता विभागात केवळ १ रुग्ण उपचार घेत आहे. अशी परिस्थिती असताना मुख्य वैद्यकीय अधिकारी आतापर्यंत केवळ एक वेळी रुग्णालयात आले. वास्तविक त्यांनी रोजच या परिस्थितीच आढावा घेणे गरजचे होते, असे काही डॉक्टारांनी यावेळी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखवले.

ऐरोली, नेरुळ, बेलापूर येथे पालिकेने टोलेजंग इमारती बांधून ठेवल्या आहेत. मात्र आजही येथील आरोग्य सेवा सुरळीत सुरू नाही. पालिका आयुक्तांनी भरतीनंतर ही सेवा सुरळीत होईल असे सांगितले होते. मात्र १८८ रुग्णसेविकांची भरती प्रक्रिया राबवली, त्यातील फक्त ११० रुग्णसेविका रुजू झालेल्या आहेत. उर्वरित रुग्णसेविका आता आचारसंहितेनंतर उपलब्ध होतील.

बेलापूर येथील माता बाल रुग्णालयात अद्यापही फक्त बा’ारुग्ण तपासणीच सुरू आहे. तेथील महिलांना प्रसूती तसेच इतर उपचारासाठी वाशी पालिका रुग्णालयातच धाव घ्यावी लागते. नेरुळच्या माता बाल रुग्णालयात देखण्या इमारतीचे अनेक मजले फक्त शोभेसाठी राहीलेल्या आहेत. येथेही प्रसुती विभाग वारंवार बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. ऐरोली येथील रुग्णालयातही लहान बाळांच्या उपचारासाठी वाशीला धाव घ्यावी लागते.

या तीनही रुग्णालयात ‘एनआयसीयू’ विभागच सुरू नाही.

पालिकेच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगीतले की, पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा पालिकेच्या रुग्णालयात फक्त ३० टक्केच सेवा दिल्या जात आहेत.

तुर्भेतील विकी इंगळे या तरुणांचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी तडकाफडकी संबंधित दोन डॉक्टरांचे निलंबित केले. या घटनेनंतर दोन डॉक्टरांनी राजनामे दिले. त्यांची समजूत काढून महिनाभर त्यांना काम करण्यास राजी करण्यात प्रशासन यशस्वी ठरले असले तरी पाच डॉक्टर, दोन २ स्त्री रोगतज्ज्ञ आणि जवळपास सर्व मशिन्स चालवण्यास ऑपरेटरची गरज आहे.

आरोग्यसेवा का बिघडली?

* पालिकेत कायमस्वरूपी डॉक्टरांची भरतीच नाही. तात्पुरत्या डॉक्टरांवर कारभार.

*  आरोग्यसेविकांना मुख्यालयात प्रशासकीय कामे.

*  सातत्याने होणारा औषधांचा तुटवडा.

*  रुग्णालयातील वाढता राजकीय हस्तक्षेप

*  नेमणूक डॉक्टर म्हणून काम प्रशासकाचे

*  ‘रिअजेंट’ हे रक्तपासणीचे केमिकल उपलब्ध नसल्याने रक्त तपासण्याचा खोळंबा

*  फिजिशियन व सर्जनची कमतरता.

लवकरच १० पोलीस रुग्णालयात असणार आहेत. स्वत: आयुक्त ट्रेकिंग घडय़ाळ वापरत असतील तर अन्य कुणी आपत्ती घेण्याची आवश्यकता नाही. पाच डॉक्टरांची नियुक्त लवकरच होणार असून अन्य भरती प्रक्रियेसाठी जाहिरातही देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांचे सहकार्य आवश्यक आहे.

-महादेव पेंढारी, अतिरिक्त आयुक्त-सेवा

First Published on May 10, 2019 12:33 am

Web Title: health care patient in navi mumbai