राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून सुविधा

पनवेल तालुक्यामधील सिडको वसाहतींतील झपाटय़ाने वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक वसाहतीला आरोग्य केंद्र असावे यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून पावले उचलण्यात आली आहेत. उलवा, कामोठे, कळंबोली आणि खारघर येथील आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही आरोग्य केंद्रे पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

सिडको मंडळाच्या आरोग्य विभागाने वेळोवेळी केलेल्या मागणीनंतर ही आरोग्य केंद्रे बांधण्यात आली असून सध्या तिथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.

कामोठे येथील सेक्टर ८ मध्ये, कळंबोली येथील गुरुद्वारासमोरील भूखंडावर आणि उलवा येथील सेक्टर २० आणि खारघरमधील सेक्टर १९ येथे सिडको मंडळाने भूखंड दिल्यानंतर राष्ट्रीय नागरी आरोग्य योजनेच्या निधीतून रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने यावर आरोग्य केंद्राच्या एकमजली इमारती बांधल्या. या इमारतींसाठी पाणी जोडणी घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

येत्या महिनाभरात हे आरोग्य केंद्र सिडको मंडळाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत केले जाणार आहे. त्यानंतर पनवेल पालिकेतील नागरिकांना या आरोग्य केंद्रातून बाह्य़ रुग्ण सेवा मिळण्यास सुरुवात होईल. या आरोग्य केंद्रांत वैद्यकीय सेवा देणारे आरोग्यसेवक नेमण्यासाठी विशेष तरतूद राष्ट्रीय नागरी आरोग्य योजनेमध्ये करण्यात आली आहे.

आरोग्य केंद्रांमध्ये प्रयोगशाळेची सोय स्वतंत्र केली आहे. तसेच औषधे व वैद्यकीय साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली, डॉक्टरांसाठी दोन खोल्या आणि औषधालय अशा १० खोल्या आरोग्य केंद्रात आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी सुमारे

५३ लाख रुपये खर्च झाला आहे. सध्या नवीन पनवेल, कळंबोली व खारघर येथे सुरू होणाऱ्या सिडकोच्या या आरोग्य केंद्रांतून दिवसाला सुमारे ९०-१०० रुग्णांना सेवा मिळते.

सिडको वसाहतींमध्ये सर्व रहिवाशांना माफक दरात आरोग्य सेवा मिळावी यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून सिडको वसाहतींमध्ये आरोग्य केंद्र बांधण्यात येत आहेत. हे काम अंतिम टप्प्यात असून वीज व पाण्याची जोडणी मिळाल्यानंतर हस्तांतर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर लवकरात लवकर हे आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी सिडको मंडळ प्रशासन प्रयत्नशील आहे.

डॉ. बी. एस. बावस्कर, मुख्य आरोग्य अधिकारी, सिडको आरोग्य विभाग