शहरातील बिघडलेल्या आरोग्य सेवेची लक्तरे वेशीवर टांगत आरोप-प्रत्यारोपाची धुळवड करणाऱ्या नवी मुंबईतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी गणेशोत्सवाचे कारण देऊन मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्यविषयक चर्चेला टाळून थेट पाच ऑक्टोबर रोजी हजेरी लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे केवळ प्रसारमाध्यमांसमोर सत्ताधारी पक्ष व पालिका प्रशासनाचे वाभाडे काढणारे नगरसेवक शहरातील डेंग्यू आणि मलेरिया या साथींच्या आजाराविषयी किती गंभीर आहेत ते दिसून येत आहे.
नवी मुंबईतील आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे. स्वच्छ पाण्याची साठवणूक आणि उघडय़ा पाण्याच्या टाक्या यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास वाढली असून या आजाराने चांगलीच उचल घेतली आहे. शहरात करण्यात आलेल्या हिवताप निमूर्लन कार्यक्रमाअंर्तगत करण्यात येणारी फवारणी किती बोगस असल्याचे नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी भर सभागृहात या औषधाचे नमुने आणून जाहीर केले आहे. ही भेसळयुक्त औषधे तपासणीसाठी चेन्नईला पाठविण्यात आली आहेत. खासगी रुग्णालयावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने रुग्ण दगावल्याची संख्या लपवली जात असून या महिन्यात २२ रुग्ण मृत्यू पावल्याचे समजते. त्यानंतर शहरात हिवताप वाढण्याचे मूळ कारण स्पष्ट होणार आहे. हिवतापाचे डास या फवारणीला जुमानेसे झाल्याने या आजाराचा प्रत्येक घरात एक रुग्ण, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईत या दोन आजारांनी थैमान घातल्याचे चित्र असून कधी काळी मलेरियाचे शहर म्हणून असलेली ओळख या सायबर सिटीने जपली आहे. पालिकेची तीन रुग्णालये बांधून तयार आहेत, पण केवळ वैद्यकीय सुविधा आणि कर्मचाऱ्यांअभावी ती सुरू करण्यात आलेली नाहीत.
अशा या शहराच्या बिघडलेल्या तब्येतीची चर्चा करण्यासाठी महापौर सुधाकर सोनावणे यांनी एका विशेष सभेचे नुकतेच आयोजन केले होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सभेत विरोधकांपासून सत्ताधारी नगरसेवकांपर्यंत सर्व नगरसेवकांनी प्रशासनावर चांगलेच तोंडसुख घेतले. यात भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले. त्यामुळे त्याला महापौर व आयुक्त दिनेश वाघमारे यांनी उत्तरे देण्याचे टाळले होते. आरोग्य सेवेवर बोलणाऱ्या या नगरसेवकांच्या तक्रारी लेखी मागविण्यात आलेल्या आहेत. पालिकेत चार प्रमुख व एक अपक्षांचा गटनेता आहे. या नेत्यांशी आरोग्य सेवेच्या उपाययोजनांबद्दल चर्चा करून सुधारणेचा विकास आराखडा तयार करण्याचे महापौर सोनावणे यांनी सत्ताधारी पक्षाचे सल्लागार माजी मंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार ठरविले होते. त्यानुसार मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी सर्व गटनेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते, पण गणेशोत्सव सुरू असल्याचे कारण देऊन या गटनेत्यांनी बैठकीला येण्यास नकार दिला. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी या बैठकीचे आयोजन करण्यात आले, पण दहा दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर नगरसेवक थकले असतील अशी काही अजब कारणे देऊन बैठकीला दांडी मारण्यात आली आहे. त्यानंतर थेट पाच ऑक्टोबर रोजीच्या बैठकीला येण्यास हे नगरसेवक अनुकूल झाले आहेत. त्यामुळे आरोग्यासारख्या संवेदनशील विषयाचे या नगरसेवकांना किती गांभीर्य आहे ते दिसून येत आहे. प्रशासनाने सोशल मीडिया आणि वर्तमानपत्राद्वारे जनजागृतीला सुरुवात केली आहे, पण या आजारांवर मात करण्यासाठी काही तातडीच्या खर्चीक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची संमती घेण्याच्या सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेला गटनेत्यांनी हरताळ फासल्याचे दिसून येते.