एप्रिलची ५ तारीख उजाडली, तरी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही. कर्मचाऱ्यांचे पगारपत्रक वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होऊन लेखा व वित्त विभागात गेल्यानंतरच या विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळते. डॉ. दीपक परोपकारी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावरून ३१ मार्च रोजी निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते. या विभागाचा कारभार कोणत्याही अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला नव्हता. त्यामुळे वेतन रखडले आहे. गुरुवारी डॉ. दयानंद कटके यांची प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.

नवी मुंबई महापालिकेचा कारभार गतिमान व्हावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असताना दुसरीकडे तांत्रिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांचे पगार हे दर महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात ५ तारखेपर्यंत होतात. या महिन्यात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना अद्याप पगार न मिळाल्यामुळे गुरुवारी विभागात तर्कवितर्काना उधाण आले होते.

पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्यासाठी शासनाकडूनच आरोग्य अधिकारी आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मंत्रालयात जाऊन राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटही घेतली.

गुरुवारी दुपापर्यंत मार्चच्या ईआरपी अर्थात पगारपत्रकावर वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाली नव्हती. एखाद्या विभागातील अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे देण्यात येतो. वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याचा कारभार कोणाकडेही सुपूर्द करण्यात आला नव्हता.

वेतन न मिळाल्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी लेखा व वित्त विभागात दिवसभर चौकशी करीत होते. या विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होतील, असे सूत्रांनी सांगितले. आरोग्य विभागात वाशी सार्वजनिक रुग्णालय बेलापूर, नेरुळ, ऐरोली येथील रुग्णालये, शहरातील नागरी आरोग्य केंद्रे येथील कर्मचारी, डॉक्टर, आरोग्यसेविका, वॉर्डबॉय यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मंत्रालयात मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि नवी मुंबई महापालिकेत शासनाकडूनच वैद्यकीय आरोग्य अधिकारी लवकरात लवकर नेमण्याची विनंती केली. त्यानुसार गुरुवारी डॉ. दयानंद कटके यांची प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लवकरच वेतन मिळेल.

डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका