News Flash

आरोग्य व्यवस्था सज्ज ; दुसऱ्या लाटेसाठी महामुंबई तयार

पालिकेच्या सर्व रुग्णालयांबरोबरच ३७ ठिकाणी हे लसीकरण केले जात आहे

विकास महाडिक

करोना साथीचा सामना करण्यासाठी गेल्या वर्षीपासून युद्धपातळीवर काम करणाऱ्या नवी मुंबई, पनवेल, आणि उरण या महामुंबई क्षेत्रांतील स्थानिक प्रशासनाला काही दिवस उसंत मिळालेली असतानाच पुन्हा सुरू झालेल्या करोना लाटेशी दोन हात करण्यासाठी तयार झालेली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातच करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाली असून एकीकडे लसीकरण आणि दुसरीकडे करोना रुग्णांची काळजी अशा दुहेरी पातळीवर ही प्रशासने कार्यरत आहेत. नवी मुंबई व पनवेल पालिका आणि उरण नगरपालिकेवर सिडको या महामंडळाचा वरदहस्त असून सिडकोने नवी मुंबईसाठी वाशी येथील भव्य प्रदर्शन केंद्र मोफत दिले आहे. पालिकेने या ठिकाणी राज्यातील एक अद्ययावत व सुसज्ज असे कोविड काळजी केंद्र उभारलेले आहे. त्या ठिकाणी एक हजार २०० रुग्णांची काळजी घेतली जात आहे. या कोविड काळजी केंद्राबद्दल अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त केले असून येथील उपचाराबद्दल रुग्णांनी प्रशासनाकडे कौतुक केले आहे. याच रुग्णालयात ७५ रुग्णशय्या ह्य़ा अत्यवस्थ रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात २०० रुग्णांवर उपचार होणार असून यातील ८० रुग्णांसाठी अत्यवस्थ रुग्णशय्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय सानपाडा येथे एमजीएम रुग्णालयाचे एक तयार रुग्णालयात सर्व  वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून ७५ रुग्णांवर कोणत्याही क्षणी उपचार होऊ शकणार आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्रात गेल्या वर्षी पन्नास हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार झालेले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालिकेने सर्वतोपरी तयारी सुरू केली असून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २० ते ३० जणांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असून त्यांच्यावर उपचार करणारी सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. गृह अलगीकरणातील रुग्णांवर पाळत ठेवली जात असून त्यांच्या इमारती प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. वाढत्या रुग्णांसाठी तुर्भे येथील निर्यात भवन व राधा स्वामी सत्संग सभागृह तयार ठेवण्यात आले आहे. वाढत्या रुग्णांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने हजारो मुखपट्टी न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून एक कोटीपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे. पालिकेच्या या तयारीबरोबरच नवी मुंबईत रिलायन्स, अपोलो, एमजीएम, फोर्टिज, डी. वाय. पाटीलसारखी अद्ययावत व आधुनिक रुग्णालये मुंबईनंतर नवी मुंबईत आहे. याशिवाय २००पेक्षा जास्त खासगी रुग्णालये रुग्णांच्या सेवेसाठी तयार आहेत. त्यामुळे पहिल्या लाटेत नवी मुंबई वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करू शकलेली आहे. त्याचप्रमाणे या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात करोना रुग्णांचे प्रसार केंद्रावर लक्ष ठेवले जात असून लसीकरण वेगात सुरू करण्यात आले आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांबरोबरच ३७ ठिकाणी हे लसीकरण केले जात आहे. याशिवाय १५ खासगी रुग्णालयात ही सेवा देण्यात आली आहे. त्यामुळे ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. कडक निर्बंध लादून पालिका या दुसऱ्या लाटेवर आरूढ होण्यासाठी तयार असून एक विशेष वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.

पनवेलमध्ये करोना रुग्णांची संख्या आता पन्नाशीजवळ आली आहे. खासगी रुग्णालयाबरोबर सामंजस्य करार करून पालिका या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करीत असून शासकीय वैद्यकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याने सिडकोने ७२ खाटांचे रुग्णालय उभारले आहे. वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टरांची पूर्तता झाल्यानंतर हे रुग्णालय लवकरात लवकर सुरू केले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयातही ७० रुग्णशय्या असून इतर रुग्णांसाठी ५३ रुग्णशय्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. उरण नगरपालिकेसाठी जेएनपीटीचे रुग्णालय तयार असून सध्या रुग्णसंख्या कमी आहे. सिडकोच्या प्रशिक्षण केंद्राचाही कोविड काळजी केंद्रासाठी वापर केला जाणार आहे. पावणेदोन लाख लोकसंख्येच्या या छोटय़ा शहरात सध्या २४ रुग्ण आहेत. जेएनपीटी बंदरामुळे या ठिकाणी येणारी आवकजावक मोठी आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण या महामुंबई क्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत असून स्थानिक प्राधिकरणांनी गेल्या वर्षांच्या अनुभवावरून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईत स्थानिक नागरिकांबरोबर शेजारच्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या मोठय़ा शहरांतील रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास येत आहेत. त्यामुळे केवळ नवी मुंंबईकरिता येथील आरोग्य यंत्रणा सक्षम नाही, तर शेजारच्या शहरांतील रुग्णांचा विचार येथील आरोग्य यंत्रणा करीत असल्याचे दिसून येते. कमी रुग्णसंख्या असतानाच काही कडक निर्बंध लादून वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करीत आहे. करोना संकटाचा सामना करीत असतानाच पालिकेला स्वच्छ भारत अभियानात पहिला क्रमांक पटकाविण्यासाठी झगडावे लागत असल्याने पालिका दोन्ही पातळीवर लढत असल्याचे चित्र आहे.

प्रयोगशाळेचा मोठा आधार

करोना संसर्ग पसरल्यानंतर सर्वात महत्त्वाची गरज भासली ती प्रयोगशाळेची. शहरात प्रयोगशाळा नसल्याने येथील करोनाचे स्वॅब मुंबईत तपासणीसाठी पाठवावे लागत होते. त्यामुळे रुग्णांचे अहवाल येण्यास उशीर होत असल्याने तोपर्यंत तो रुग्ण अनेकांच्या संपर्कात येत होता व त्यामुळे करोना संसर्ग पसरत होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने पहिले महत्त्वाचे पाऊल उचलले ते प्रयोगशाळा उभारणीचे. अगदी कमी कालावधीत नेरुळच्या रुग्णालयात ही प्रयोगशाळा उभारण्यात आली. त्यामुळे करोनाकाळात या प्रयोगशाळेचा मोठा आधार रुग्णांना मिळाला. खरं तर ही शहराची अगोदरपासूनचीच गरज होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत होते. आताही प्रयोगशाळा करोनानंतरही शहरासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या ठिकाणी पालिका रुग्णालयातील रुग्णांना आपल्या चाचण्यांसाठी इतर ठिकाणी खेटे मारावे लागणार नाहीत. सर्व चाचण्या या प्रयोगशाळेत मोफत होणार आहेत.

पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा कायापालट

गेली अनेक वर्षे नवी मुंबईतील आरोग्य सुविधेवर प्रश्न उपस्थित होत होते. तोकडी आरोग्य व्यवस्था असल्याने सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. पालिकेच्या एकमेव वाशी येथील रुग्णालयाचा रुग्णांना आधार होता. करोना संकटानंतर आरोग्य व्यवस्थेतील हा तोकडेपणा प्रकर्षांने समोर आल्यानंतर पालिका प्रशासनाने दीर्घकालीन आरोग्य सुविधांचा विचार करीत नवीन वर्षांपासून आपल्या आरोग्य व्यवस्थेत वाढ केली आहे. आता पालिकेची नेरुळ व ऐरोली ही दोन माता बाल रुग्णालयांचे सर्वसामान्य रुग्णालयांत रूपांतर करण्यात आले असून त्या ठिकाणी जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. यापूर्वी या ठिकाणी फक्त इमारती उभ्या केल्या होत्या, मात्र फक्त बारुग्ण सेवा मिळत होती. आता या ठिकाणी पुढील काळात सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:27 am

Web Title: health system ready to face second wave of coronavirus in navi mumbai zws 70
Next Stories
1 नियमभंग केल्यास आस्थापनाला टाळे
2 हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबे
3 पनवेलमध्ये सात भरारी पथके
Just Now!
X