नवी मुंबई : मंगळवारी रात्रीपासून बुधवार दुपापर्यंत झालेल्या अतिवृष्टीने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर किल्ले गावठाण, महापे, खारघर येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रात्रीपासून विस्कळीत झालेली वाहतूक बुधवारी सकाळी अकरानंतर पूर्ववत झाली.

किल्ले गावठाण ते जेएनपीटी या महामार्गावर जास्त काळ वाहतूक कोंडी झाली होती. उलवा नोड, तरघर, वहाळ परिसरातही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. किल्ले गावठाणपासून शीव-पनवेल मार्गापर्यंत वाहनांची मोठी रांग गेली होती. सकाळी दहानंतर वाहतूक सुरू झाली. नेरुळ ते सीबीडी, सानपाडा ते जुईनगर आणि वाशी टोलनाक्यावरही वाहतूक कोंडी झाली होती. महापे ते शीळ फाटा हा रस्ताही नेहमीप्रमाणे ठप्प झाला होता. या ठिकाणी सकाळी अकरानंतर वाहतूक सुरू झाली.

महापे शीळफाटा रस्त्यावरील मिलेनियम बिझनेस पार्क येथे मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबले होते. येथील बस स्थानकही पाण्यात गेले होते. ऐरोली-मुलुंड रस्त्यावरील वाहतूक कोलमडली होती.

किल्ले गावठाण ते उरण आणि जेएनपीटी मार्गावर रेतीबंदर उड्डाणपुलानंतर अंबुजा कंपनी समोरील रस्ता, तरघर स्टेशन लगत उड्डाणपूल आणि त्याखालील रस्ता, वहाळ ते गव्हाण फाटा दरम्यान मोठय़ा प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यात रात्रभर पाऊस सुरू असल्याने वाहतूक मंदावली होती.

उरण फाटा ते किल्ले गावठाण या पाच ते सात मिनिटांच्या अंतर कापण्यासाठी अर्धा तास लागत होता. तर किल्ले गावठाण ते गव्हाण फाटा अध्र्या तासाच्या अंतरासाठी अडीच ते तीन तास लागत होते, अशी माहिती मोहनसिंग दिगवा या वाहनचालकाने दिली.

 

सकाळी दहापर्यंत सर्वच ठिकाणची वाहतूक

सुरळीत झाली. मात्र किल्ले गावठाण ते जेएनपीटी रस्त्यावर वाहतूक सुरळीत होण्यास दुपारी एक वाजले. पावसाचा अंदाज घेत रात्रीपासूनच वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.

 अरुण पाटील, साहाय्यक आयुक्त, वाहतूक विभाग