नवी मुंबईत दोन दिवसांत ५०० मि.मी. पाऊस; काही भागांत पाणी साचले; वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
नवी मुंबई : गेल्या दोन दिवसांत नवी मुंबई शहरात पडलेल्या ‘आषाढसरीं’नी अक्षरश: नागरिकांची अडवणूक केली. शहरातील काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. ठाणे-बेलापूर मार्गालाही मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडीला सामोर जावे लागले. गेल्या दोन दिवसांत शहरात ५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

नवी मुंबई शहरात शनिवार सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली, तर शहरात रविवारी व सोमवारी मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. जोरदार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते, तर सोमवारी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. मुसळधार पाऊस असल्याने उत्साही पर्यटकांना मात्र पावसाची मजा लुटण्याचा मोह आवरता न आल्याने नवी मुंबई शहरातील विविध पर्यटनस्थळांवर धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शहरात ठाणे-बेलापूर मार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. शहरात ५ ठिकाणी पाणी साचलेल्या घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागात करण्यात आली आहे. दिघ्यातील गणपतीपाडा, कोपरखैरणे भुयारी मार्ग आणि घणसोली, ऐरोलीमधील काही भागांत पाणी साचल्याच्या घटना घडल्या. पावसाची झोडपधार अधिक असल्याने शहरात दोन दिवसांत ११ झाडे पडली. शहरात पालिकेने नालेसफाई व आपत्कालीन व्यवस्थेबाबत अधिक सतर्कता ठेवल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत. रेल्वेमार्गाखालील भुयारी मार्गांवर काही ठिकाणी पाणी साठण्याची यंत्रणा सज्ज असल्याने मुंबई व इतर शहरांप्रमाणे पाणी साठण्याच्या घटना आढळून येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वाहतुकीचा बोऱ्या

’ ठाणे-बेलापूर मार्गाला पावसाचा फटका बसला. या मार्गावर वाहतूक कोंडी झाली.

’ महापे उड्डाणपुलाच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहतूक रबाळे नाका ते महापेपर्यंत खोळंबली होती.

’ शीव-पनवेल मार्गावर सानपाडा व तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलाखाली काही प्रमाणात वाहतूक कोंडी होती.

बेलापूर तलावात मोटर बुडाली

बेलापूर येथील तलावाजवळ कार पार्क करत असताना पावसाचा अंदाज न आल्याने तलावात बुडाली. चालकाने प्रसंगावधान राखत कारमधून उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. ही कार अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नाने बाहेर काढली.