जनजीवन विस्कळीत ; वाहतूक कोंडी; बोनसरी, इंदिरानगर पाण्यात

नवी मुंबई मुंबईला पर्याय म्हणून अतिशय नियोजनबद्धपणे नवी मुंबई शहर वसवण्यात आले. दरवर्षी पावसाळय़ात मुंबईची ‘तुंबई’ होऊन देशाच्या आर्थिक राजधानीचे जनजीवन ठप्प होते. ही वेळ नवी मुंबईवर येऊ नये म्हणून रस्ते, नाले, धारण तलाव यांची पद्धतशीर आखणी करण्यात आली. मात्र, आता हे नियोजनही अपुरे पडू लागले की काय, असा प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती नवी मुंबई शहराने सोमवारी अनुभवली. जागोजागी पाण्याखाली गेलेला शीव-पनवेल महामार्ग, वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी, पाण्यावर तरंगणारी वाहने, एखाद्या नदीसारखे प्रवाहीत झालेले रस्ते हे चित्र पाहिल्यावर ही ‘नवी तुंबई’ ची नांदी तर नव्हे ना, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

आठवडाभरापासून नवी मुंबईत पाऊस सुरू असून सोमवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसाने नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. महामार्गावर दिवसभर वाहतूक कोंडीचे चित्र होते. बोनसरी परिसरात २५ घरांमध्ये तर इंदिरानगर परिसरातील १५ घरांत पाणी शिरले. चार घरे पावसात वाहून गेली. शहरात सरासरी ९६ मिलिमीटर पाऊस झाला.

जून कोरडा गेल्यानंतर पावसाने जुलै महिन्याच्या आठ दिवसांत दोन मिहन्यांची सरासरी भरून काढली आहे. सोमवारी ऐरोली व वाशी पर्जन्यमान केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सकाळपासूनच पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली. कामावर निघालेल्या व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.

तुर्भे विभागातील बोनसरी परिसरात कॉरीवरून वाहून येणारे पाणी मुख्य नाल्यातील दगड, कचरा यांनी अडविल्याने परिसर जलमय झाला. २५ घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. ३ ते ४ फूट पाणी साचल्याने येथील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. घरातील सर्व साहित्याची नासाडी झाली. तुर्भे येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील पेन्टर शेठ व ओमकार शेठ कॉरी येथे १५ घरांमध्ये पाणी घुसले. येथील चार घरे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे संसार भर पावसात उघडय़ावर आले. तुर्भे व नेरुळचे विभाग अधिकारी, अग्निशमन दलासह विविध विभागांचे कर्मचारी मदतीसाठी उपस्थित होते. या ठिकाणच्या वाहून गेलेल्या चार घरांतील कुटुंबांना इंदिरानगर समाजमंदिरात हलविण्यात आले आहे.

पावसाने शीव-पनवेल महामार्गासह ठाणे-बोलापूरवरही पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणत साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या, झाडे कोसळण्याच्या, शॉर्ट सर्किटच्या, आगीच्या व काही भागांमध्ये रस्त्यावर तसेच रेल्वे फलाटावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्ते व रेल्वे वाहतूकही मंदावल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.

तुर्भे परिसरातील इंदिरानगर व बोनसरीत पावसाने हाहाकार उडविला. अनेक घरांमध्य पाणी शिरल्याने आठवडाभराच्या राशनसह इतर साहित्य वाहून गेल्याचे येथील एका महिलेने सांगितले. नाल्यामध्ये क्वॉरीवरून येणारे दगड व कचऱ्यामुळे नाले भरून गेले. त्यामुळे पाणी वाहून जायला जागाच नव्हती. त्यामुळे पाणी घरात घुसले. पालिका कर्मचाऱ्यांनी पोकलेनच्या साहाय्याने नाल्यातील दगड बाजूला काढल्याने पाण्याला प्रवाह मिळाला.

इदर दळवी, मदन पवार, मदन दळवी, दशरथ काटे यांच्या डोक्यावरचे छप्पर वाहून गेले.

मी पहिल्यांदाच पाण्याचा प्रवाह महामार्गावर वाहताना पाहिला. पांडवकडय़ावरून निघणारे पावसाळी पाणी ज्या बांधातून पास होते, तो बांध फुटल्याने हा प्रलय सोमवारी पाहायला मिळाला. कोपरा गाव व खारघर वसाहत असा ग्रामस्थांचा नित्याचा संबंध आहे. सोमवारी गावाकडून वसाहतीकडे जाणारा उड्डाणपुलाखालचा मार्ग पाण्याखाली असल्याने मुलांना शिकवणीवरून आणण्यासाठी पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागली.

-विलास कानाशेठ भोईर, ग्रामस्थ, कोपरा गाव

आमच्या घरात सकाळी साडेनऊ ते दहा वाजता पाणी आले. आमचे सगळे वाहून गेले. खाण्यासाठी भरलेला आठ दिवसांचा किराणापण वाहून गेला.

– काशीबाई पवार, बोनसरी, तुर्भे

सोमवारी कमी वेळेत  जास्त पाऊस पडला. त्यामुळे पाणी साचल्याचे प्रकार  पाहायला मिळाले. तुर्भे परिसरात घरात पाणी जाणे व काही झोपडय़ा वाहून जाण्याच्या  घटना घडल्या आहेत. मंगळवारी महामार्ग व तुर्भे येथील ठिकाणी भेट देणार आहे.                                           

– डॉ. रामास्वामी ऐन. आयुक्त, नवी मुंबई  महापालिका

सखल भागांत गुढघाभर पाणी

बेलापूर येथील पोलीस आयुक्तालय, जुईनगर रेल्वे स्थानकाबाहेरील मिलोनियम टॉवर, सानपाडा सेक्टर २, वाशी सेक्टर २ येथील पोलीस कॉलनी, कोपरी सेक्टर २६, नेरुळ एमआयडीसी रोड, तुर्भे से २१, राबळे पोलीस स्टेशन परिसर, कोपरखैरणे भुयारी मार्ग, कोपरखैरणे सेक्टर ८ ,वाशी शबरी हॉटेल चौक, ऐरोली इत्यादी भागात गुडघाभर पाणी साचले होते. पालिका आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी पंपाच्या साह्य़ाने पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करीत होते.

पावसाची नोंद (मिलीमीटरमध्ये)

बेलापूर- ८५.३

नेरुळ-  ८९.९०

वाशी-   १०४.३०

ऐरोली-  १०६.८०

सरासरी- ९६.६२

उरणचे ‘रानसई’ भरले

उरण तालुक्यासह औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या रानसई धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धरण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या उरणच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी ५ जुलैलाच रानसई धरण भरून वाहू लागले होते. ८ जुलैपर्यंत धरण क्षेत्रात एकूण ७२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर धरणाची एकूण पातळी ११७ फूट उंचीची असून ती पार करून धरण भरून वाहू लागले  अशी माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रणजित बिरंजे यांनी दिली.