पनवेलमध्ये शनिवारी सकाळपासून अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती ओढावली. महापालिका प्रशासनाने शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालाही बसला आहे. चिखले गावाजवळ महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी झाली.

तालुक्यातील कासाडी, घोट व गाढी या तीनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बेलवली गावाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहात असल्याने या गावाचा संपर्क काही काळासाठी तुटला. तर उमरोली गावाच्या प्रवेशद्वारावरील पुलावरून गाढी नदीने पातळी ओलांडल्याने या पुलावरील वाहतूक बंद होती.

पनवेल शहरात पटेल मोहल्ला या मुस्लीम बहुलवस्ती असणाऱ्या परिसरासह कोळीवाडय़ाला व वडघर परिसरातील घरात पाणी शिरल्याने स्थानिकांना शाळांच्या इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. काही नागरिकांनी मशिदीमध्ये आश्रय घेतला.

शहरातील पायोनियर सोसायटी, कफनगर, वीर सावरकर चौक व साईनगर या परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. कातकरी वाडीतील दोन घरे अतिवृष्टीमुळे पडली. शनिवारी दुपारी जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये पाणी शिरले होते. नवीन पनवेल वसाहतीतील सखल भागात पाणी साचले होते. अभ्युदय बँकेसमोरील बांठीया विद्यालयाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेल्याने नागरिकांना दुभाजकावरून चालता यावे यासाठी दोरी लावण्यात आली होती. करंजाडे वसाहतीमधून जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गावरही पाणी साचले होते.

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पासाठी सिडको मंडळाने डोंगर तोडून मातीचा केलेला भराव आणि नैसर्गिक नद्यांचे बदललेले प्रवाह ही कामे पनवेलकरांसाठी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. मात्र शहरातील जलमय स्थितीमुळे हा दावा फोल असल्याचे दिसून येते.

मुंबई-पुणे महामार्गावरील नाल्यांत पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी महामार्गावर आले आहे. त्यामुळे महामार्गावर सुमारे पाच किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरण आणि आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येथे धाव घेऊन महामार्गानजीकचे पावसाळी नाले स्वच्छ केल्यानंतर साडेतीन तासांनी सायंकाळी वाहतूक पूर्ववत झाली.