दिवसभरात ७० मिलिमीटर पावसाची नोंद

नवी मुंबई : दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून मंगळवारी शहरात दिवसभर पावसाची झोडपधार सुरू होती. त्यामुळे दिवसभरात शहरात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत सरासरी ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मोरबे धरणाची पाणीपातळी ८५.५ मीटपर्यंत पोहोचली आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई शहरात १ जूनपासूनच पावसाची सुरुवात झाली असून आतापर्यंत २,३९४.९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. मंगळवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारनंतर जोर कमी झाला होता.

शहरात कोठेही पाणी साचल्याची व झाडे कोसळल्याची घटना घडली नसल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. आज शहरात बेलापूर विभागात सर्वाधिक ८८.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर ऐरोली विभागात सर्वात कमी ४९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

२,३९४.९४ आतापर्यंतचा पाऊस

३००४ मोरबे पाणलोट क्षेत्र पाऊस

पावसाची नोंद (मिलिमीटर)

  • बेलापूर :  ८८.८०
  • नेरुळ :  ८८.००
  • वाशी : ६७.००
  • कोपरखैरणे : ५७.००
  • ऐरोली : ४९.००
  • सरासरी पाऊस : ७०